Mumbai Monsoon Update 2019: शाळा कॉलेजना सुट्टी नाही,परिस्थिती बघून निर्णय घ्या- शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार
Image Used For Representation (Photo Credits: Facebook)

काल रात्री पासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईसह उपनगरांना अक्षरशः झोडपून काढले आहे. यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी सुद्धा साचलं आहे. असं असलं तरी, राज्यातील शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मात्र कोणतीही सूट देण्यात आलेली नाही. शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी एक ट्विट मार्फत दिलेल्या माहितीनुसार राज्यातील शाळा आणि कॉलेजना सरकारी सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही , मात्र संबंधित भागातील परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा कॉलेजच्या प्रशासनाने किंवा मुख्याध्यापकांनी योग्य तो निर्णय घ्यावा असेही ते म्हणाले आहेत.

आशिष शेलार ट्विट

या ट्विटवर अनेकांनी उत्तरे देत शाळांना सुट्टी जाहीर करण्याची विनंती केली आहे, तसेच शाळा प्रशासनाकडून निर्णय घेण्यात दिरंगाई होत असल्याची तक्रार सुद्धा करण्यात येत आहे.

दरम्यान , पावसामुळे मुंबईकरांचे आज पुरते हाल होण्याची चिन्हे दिसत आहेत. मध्य रेल्वेवरील वांगणी स्थानकादरम्यान पाणी साचल्याने सकाळपासूनच महालक्ष्मी एक्सप्रेस अडकली होती परिणामी लोकल गाड्यांची वाहतूक सुद्धा 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरू होती. तर पावसामुळे विमान व रस्ते वाहतूकीवरही मोठा परिणाम झाल्याचे समजत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन देण्यात आले आहे.