
मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी मुंबई लोकल (Mumbai Local) रविवारी देखभालीच्या कामांसाठी अनेकदा काही काळ बंद ठेवली जाते. मुंबई मध्ये 25 सप्टेंबर च्या रविवारी मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वे (Central Railway) कडून माटुंगा ते ठाणे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान आणि पश्चिम रेल्वे (Western Railway) कडून सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक घेतला जाईल अशी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान या ब्लॉकच्या काळात काही फेर्या विलंबाने धावतील तर काही रद्द होतील अशी माहिती देण्यात आली आहे.
मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते ठाणे स्थानकादरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. हा ब्लॉक स्लो आणि फास्ट दोन्ही ट्रॅक वर असणार आहे.धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. त्यामुळे काही ट्रेन रद्द असतील तर काही 15-20 मिनिटं उशिराने धावणार आहेत.
हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे मार्गावर ब्लॉक असणार आहे. 11.40 ते 4.40 या वेळेत हा ब्लॉक असेल. ब्लॉक दरम्यान सीएसएमटी/वडाळा येथून वाशी/बेलापूर/पनवेलकरीता धावणाऱ्या अप आणि डाऊन लोकल बंद असणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल आणि कुर्ला दरम्यान २० मिनिटांच्या फरकाने विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येतील.
पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान सकाळी 10 ते 3 या वेळेत अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे. ब्लॉक दरम्यान धीम्या मार्गावरील फेऱ्या जलद मार्गावर वळविण्यात येतील. विलेपार्ले स्थानकात या फेऱ्यांना दुहेरी थांबा असेल तर राम मंदिर स्थानकात लोकल थांबणार नाहीत. ब्लॉक कालावधीत काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.