Mumbai-Kolhapur थेट विमानसेवा आजपासून होणार सुरू; Star Air चं आठवड्यातून 3 दिवस उड्डाण
Flight | Representational Image | (Photo Credits: Twitter)

मुंबई- कोल्हापूर (Mumbai-Kolhapur) थेट विमानसेवा सुरू करण्याची मागणी अखेर पूर्णत्त्वास येत आहे. आजपासून या सेवेचा आरंभ होणार आहे. संजय घोडावत यांची ‘स्टार एअरवेज’ (Star Airways) कंपनी ही थेट विमानसेवा उपलब्ध करून देत आहेत. दरम्यान या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजेरी लावणार आहेत.

मुंबई-कोल्हापूर थेट विमानसेवा आता आठवड्यातून 3 दिवस चालवली जाणार आहे. दर मंगळवार, गुरूवार आणि शनिवारी विमानसेवा असेल. यासाठी किमान भाडं 2573 रूपये असणार आहे. रस्तेमार्गे 7-8 तासांचा प्रवास आता विमानाने केल्यास अवघ्या तासाभराचा होणार आहे.

मुंबई विमानतळावर सकाळी 10.30 वाजताचे विमान कोल्हापुरात 11.20 ला पोहचणार आहे. तर कोल्हापूरातून परतीचा प्रवास 11.50 वाजता सुरू होईल हे विमान दुपारी 12.45 वाजता मुंबई मध्ये पोहचणार आहे. हे देखील नक्की वाचा: Kolhapur: कोल्हापूर विमानतळाला 31 मार्च 2023 पर्यंत मिळणार वाढीव क्षमता आणि जागतिक दर्जाच्या सुविधांसह नवीन टर्मिनल इमारत.

मुंबई-कोल्हापूर विमानसेवा कोरोना काळात ठप्प झाली होती. या सेवेला चांगला प्रतिसाद असूनही ही सेवा बंद झाल्याने प्रवाशांकडून ती पुन्हा सुरू व्हावी यासाठी मागणी वाढत होती. सध्या कोल्हापूरातून तिरुपती, बंगळुरू, अहमदाबाद, हैदराबाद या शहरासाठी विमानसेवा सुरू आहे.