दिवाळीत मुंबईचे डबेवाले सुद्धा सुट्टीवर; जाणून घ्या त्यामागचं नेमकं कारण
मुंबई डबेवाले (Photo Credits: wikimedia)

मुंबईचे डबेवाले म्हणजे जणू काही मुंबईच्या कामगार वर्गाची लाइफलाईनच. अगदी कामगार वर्गापासून ते व्यवसायिकांपर्यंत अनेकांना रोज जेवणाच्या वेळेत न चुकता डबा पोहोचवण्याचं काम हे मुंबईचे डबेवाले नित्यनियमाने अचूकरीत्या करत असतात.

परंतु हेच डबेवाले दिवाळीनिमित्त चार दिवसांच्या सुट्टीवर असणार आहेत. शनिवार २६ ऑक्टोबर ते बुधवार ३० आक्टोबरपर्यंत डबेवाले सुट्टीवर जाणार आहेत. तर गुरूवार म्हणजेच 31 ऑक्टोबरपासून ते पुन्हा कामावर रूजू होतील.

मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी माध्यमांशी बोलताना ग्राहकांकडे एक विनंती देखील केली आहे. ते म्हणाले, "या रजेचा पगार ग्राहकांनी कापू नये तसेच एक जादा पगार बोनस म्हणून आक्टोबर महिन्याच्या पगाराबरोबर डबेवाल्यांना द्यावा ही नम्र विनंती."

"दिवाळीच्या सुट्टी निमीत्त शाळा, काॅलेज सोबतच अनेक शासकीय,निमशासकीय, खाजगी कार्यालयांना सुट्टी असल्यामुळे डबेवाल्यांनी ही सुट्टी घेतल्याने कोणत्याच ग्राहकांची गैरसोय होणार नाही आणि जर अशी गैरसोय कोणाची होणार असेल तर आम्ही दिलगीरी व्यक्त करतो," असे देखील ते म्हणाले.

खुशखबर! ठाणे आणि नवी मुंबई नंतर, BMC परिसरातही प्रवाशांसाठी उपलब्ध होणार पर्यावरण पूरक सायकल्स; पालिकेचा उपक्रम

मुंबईच्या डबेवाल्यांची ओळख फक्त मुंबईतच नव्हे तर जागतिक स्तरावर पोहचली आहे. प्रिन्स हॅरी (Prince Harry) आणि मेघन मार्कल (Meghan Markle) या शाही दामपत्याला पुत्ररत्न झाल्यावर, डबेवाल्यांनी मुंबईतून बाळंतविडा पाठवला होता. इतकंच नाही तर प्रिन्स हॅरी आणी मेघन यांच्या लग्न सोहळ्यातही डबेवाल्यांनी आवर्जुन मराठमोळा आहेर पाठवला होता.