मुंबईः हार्बर रेल्वे वाहतूक विस्कळीत; चेंबूर - टिळकनगर दरम्यान रेल्वे रूळाला तडे
Representational Image (Photo Credits: PTI)

मुंबईमध्ये आज सलग दुसर्‍या दिवशी हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. आज (11 जुलै) हार्बर मार्गावरील चेंबूर -टिळक नगर स्थानकाजवळ रेल्वे रूळाला तडे गेल्याने हार्बर रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं आहे. सकाळी चाकरमनी कामानिमित्त बाहेर पडण्याच्या वेळेस नेमका हा प्रकार घडल्याने रेल्वेसह प्लॅटफॉर्मवरही प्रवाशांची मोठी गर्दी आहे. सध्या हार्बर मार्गावर किमान 15-20 मिनिटं ट्रेन उशिराने धावत आहेत. तांत्रिक बिघाडामुळे हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत, मध्य रेल्वे वाहतुकीवरही परिणाम; मुंबईकर संतप्त

मुंबई, ठाणे परिसरात पहाटेपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे वातावरणात बदल झाला की रेल्वेचे रूळही आकुंचन पावतात. चेंबूर स्थानकातही आज असाच प्रकार घडला. मात्र वेळीच रेल्वे प्रशासनाच्या कर्मचार्‍यांना हा प्रकार लक्षात आल्याने तातडीने दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. सध्या हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक किमान 15-20 मिनिटं उशिरा सुरू असल्याने मुंबईकरांचे हाल सुरू आहेत.

सध्या मुंबईत पावसाच्या दमदार सरी अधून मधून बरसत असल्याने मध्य रेल्वेची वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. हार्बर रेल्वे मार्गावर अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक थांबत थांबत सुरू आहे.