मुंबई: धारावी येथे गटरमध्ये पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू; BMC च्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह
Drain | image only representative purpose (Photo credit: Pixabay)

मुंबई: गोरेगाव येथे गटरमध्ये पडून एक मुलगा बेपत्ता झाल्याची घटना ताजी असतानाच आज (15 जुलै 2019) पुन्हा एकदा अशीच घटना धारावी येथे घडली. धारावी येथील राजीव गांधी कॉलनी (Rajiv Gandhi Colony, Dharavi) परिसरात राहणारा एक 7 वर्षाचा मुलगा गटरमध्ये पडला. सुमीत मुन्ना जैसवार असे या मुलाचे नाव आहे. शहरात पावसाची संततधार सुरुच असताना अनेक ठिकाणी गटरची झाकणे उगडीच आहेत. त्यामुळे त्यात पडून होणाऱ्या अपघातांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. गटारात पडून लहान मुले बेपत्ता होण्याची गेल्या पंधरवड्यातील ही दुसरी घटना आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.

प्राप्त माहितीनुसार, सुमीत मुन्ना जैसवार असे या मुलाचे नाव आहे. धारावीत क्र. 1 उद्यानाजवळील राजीव गांधी कॉलनीत पिवळा बंगला परिसरात  हे गटर आहे. सोमवारी (१५ जुलै २०१९) दुपारी 3  च्या सुमारास हा मुलगा त्या गटरमध्ये पडला. गटरमधली पाण्यात तो बुडू लागला होता. मात्र, स्थानिक पोलिसांनी त्याची सुटका केली. पुढील उपचारासाठी या मुलाला शीव रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

गोरेगाव येथील आंबेडकर नगर परिसरात  गटरचे झाकन  उघडे असल्याुमळे त्यात दिव्यांश सिंग नावाचा एक तीन वर्षांचा मुलगा पडला. तेव्हापासून दिव्यांश बेपत्ताच आहे.  पोलीस, महापालिका, अग्निशमन दल, एनडीआरएफच्या पथकाने तब्बल ४८ तास शोधमोहीम राबवली. परंतु, त्याचा काहीच फायदा झाला नाही. अखेर ही शोधमोहीम थांबविण्यात आली. ही शोधमोहीम थांबवत असल्याचे मुंबई महानगर पालिकेकडून अधिकृत सांगण्यात आले. (हेही वाचा, मुंबई : गोरेगाव येथील गटारात पडलेला दिव्यांश सिंग बेपत्ता, 3 दिवसांनंतर प्रशासनाने थांबवली शोध मोहिम)

एएनआय ट्विट

दरम्यान, दिव्यांश बेपत्ता होण्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा अशाच प्रकारची घटना पुढे येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबई महापालिकेच्या व्यवस्थापणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.