
बनावट कागदपत्रांच्या अधारे राज्यसेवेत अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांची काहींकडून फसवणूक सुरु असल्याची माहिती पुढे आली आहे. याबाबतत महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) अर्थातच एमपीएससी (MPSC) कडे तक्रारी वाढल्या आहेत. या तक्रारींची दखल घेऊन चौकशी करण्यात येणार आहे. तसेच, दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा एमपीएससीने दिला आहे. एमपीएससीने याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे.
एमपीएसीने ट्विट मध्ये म्हटले आहे की, ''महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांमधून अधिकारी म्हणून निवड झाली असल्याची बनावट कागदपत्रे तयार करवून त्याआधारे काही उमेदवार/व्यक्तींकडून फसवणुकीचे प्रकार घडत असल्याच्या बाबी आयोगाच्या निदर्शनास आल्या आहेत. उदा. 1. एका महिला उमेदवाराने राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 मध्ये अनुत्तीर्ण असताना खेळाडू प्रवर्गातून उपजिल्हाधिकारी पदावर आयोगाकडून निवड झाली असल्याचे भासवून अहमदनगर जिल्ह्यातील काही प्रतिष्ठित संस्थांची फसवणूक केली आहे. जालना जिल्ह्यातील एका दुकानदार व्यक्तीने राज्यकर निरीक्षक/राज्यकर उपायुक्त पदावर आयोगाकडून निवड झाली असल्याचे तसेच वस्तू व सेवा कर विभागाकडून नियुक्ती झाली असल्याचे भासवून सत्कार स्विकारत विविध संस्था/वर्तमानपत्र यांची फसवणूक केली आहे. अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्या उमेदवार/व्यक्ती यांच्यावर आयोगाच्या कार्यालयाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे, असा इशारा आयोगाने दिला आहे.
ट्विट
2. जालना जिल्ह्यातील एका दुकानदार व्यक्तीने राज्यकर निरीक्षक/राज्यकर उपायुक्त पदावर आयोगाकडून निवड झाली असल्याचे तसेच वस्तू व सेवा कर विभागाकडून नियुक्ती झाली असल्याचे भासवून सत्कार स्विकारत विविध संस्था/वर्तमानपत्र यांची फसवणूक केली आहे.(3/4)
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) February 15, 2022
दरम्यान, राज्य लोकसेवा आयोगाने अवाहन केले आहे की, एमपीएससी परीक्षेद्वारे नियुक्ती झाल्याची माहिती देत फसवणूक करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यासाठी संबंधितांची माहिती नागरिकांनी द्यावी. जेणेकरुन अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्यांना चाप बसेल, असे एमपीएससीने म्हटले आहे.