सोलापूर: विजेचा धक्का लागून माय-लेकाचा मृत्यू
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

सोलापूर (Solapur) जिल्ह्यात विजेचा धक्का (Electric Shock) लागून आई व मुलाचा मृत्यू (Mother and Son Dies) झाला आहे. रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. शशिकला गणेश गंजी (वय 52) आणि अजय गणेश गंजी (वय 25) असे मृत माय-लेकाची नावे आहेत.

आज सोलापूर शहरामधील पेठ परिसरातील फैजुलवारी मश्जिद वडार गल्ली येथील राहत्या घरा समोर लोखंडी तारेवरचे कपडे काढत असताना अजयला विजेचा धक्का बसला. त्यानंतर त्याची आई शशिकला त्याला बाजुला काढण्यासाठी गेली असाता त्यांनाही विजेचा धक्का बसला. या घटनेते दोघांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण सोलापूर शहरात खळबळ उडाली आहे. तसेच गंजी परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (हेही वाचा - 'बळीराजा नको करु आत्महत्या' तिसरी शिकणाऱ्या मुलाने शेतकरी आत्महत्येवर सादर केली कविता अन् त्याच रात्री वडीलांनी विष प्राशन करून संपवली जीवन यात्रा)

आज सकाळी अजय आंघोळ करुन कामाला जाण्यासाठी तयारी करत होता. आंघोळ झाल्यानंतर अजय अंगणातील तारेवरवरील कपडे काढण्यासाठी गेला. त्याने तारेला हात लावताच त्याला विजेचा धक्का बसला. त्यामुळे तो खाली कोसळला. परंतु, त्याचा हात तारेमध्येचं अडकलेला होता. हा सर्व प्रकार त्याची आई शशिकलाने पाहिला. त्या लागलीच अजयकडे धावत गेल्या. त्यांनी अजयचा हात तारेपासून दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही विजेचा धक्का बसला.

विशेष म्हणजे हा सर्व प्रकार पाहुन अजयचे वडील गणेश गंजी घरातून बाहेर आले. त्यांनी या दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही विजेचा धक्का बसला. परंतु, ते लगेचचं बाजूला सरकले. त्यानंतर त्यांनी तारेला चिकटलेल्या माय-लेकांना बाजूला काढले. त्यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने अजय आणि शशिकला यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. या सर्व प्रकारामुळे परिसरातील लोकांनी घटनास्थळी गर्दी केली. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली आहे.