Maharashtra Weather Update: उत्तर कोकण वगळता राज्याच्या बहुतांश भागात उद्या सकाळपर्यंत मध्यम पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता
Monsoon In Maharashtra 2020 | (Image Used For Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com )

Maharashtra Monsoon Update: महाराष्ट्रात काही भागात कडाक्याचा उकाडा जाणवत आहे तर काही जिल्ह्यांत अवकाळी पावसाने पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. दरम्यान उत्तर कोकण वगळता राज्याच्या बहुतांश भागात उद्या सकाळपर्यंत तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी अपेक्षित आहेत असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घ्यावी आणि आवश्यक ते खबरदारीचे उपाय करावेत असे सांगण्यात येत आहे.

भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये 28 आणि 29 एप्रिलला अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. यामध्ये या जिल्ह्यात मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाले असून फळबागांचेही नुकसान झाले आहे.हेदेखील वाचा- Weather Update in Maharashtra: राज्यात आजपासून पुढील पाच दिवस 'या' जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा, हवामान खात्याचा अंदाज

दरम्यान मंगळवार आणि बुधवारी अहमदनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि संपूर्ण मराठवाडा जिल्ह्यांत अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.देशात सध्या अनेक ठिकाणी कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले आहेत. त्यामुळे दक्षिण भारतासह उत्तरेकडील काही राज्यांत अवकाळी पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि तमिळनाडूची दक्षिण किनारपट्टी दरम्यान तीव्र कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. राज्यातील दक्षिण भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान विदर्भात कमाल तापमानात वाढ झाली आहे. ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर इथं सर्वाधिक 43 अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली.