MNS: मुस्लिम संघटनांकडून धमक्या? बाळा नांदगावकर यांच्याकडून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट, पत्रही दिले

ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी होती याबाबत मनसेने अद्यापही स्पष्ट केले नाही. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबद्दल भूमिका घेतल्यानंतर काही मुस्लिम संघटनांकडून धमक्यांचे फोन आल्याबाबत ही भेट असल्याचे समजते.

Bala Nandgaonkar | (Photo Credits: Facebook)

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली आहे. ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी होती याबाबत मनसेने अद्यापही स्पष्ट केले नाही. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबद्दल भूमिका घेतल्यानंतर काही मुस्लिम संघटनांकडून धमक्यांचे फोन आल्याबाबत ही भेट असल्याचे समजते. या वेळी बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्र्यांना एक पत्रही दिले. दरम्यान, राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर महाराष्ट्र पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर धरपकड केली आहे. तसेच, काही नेत्यांना कार्यकर्त्यांना हद्दपारीच्या नोटीसाही पाठवल्या आहेत. या पार्श्वभूमीवर या भेटीत चर्चा झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे की, बाळ नांदगावकर यांना मुस्लिम संघटनांकडून मोठ्या प्रमाणावर धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे याबाबतची माहिती देण्यासाठी नांदगावकर यांनी गृहमंत्र्यांची भेट घेतल्याची मनसेतील सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, याबाबत मनसेकडून अद्याप अधिकृत पुष्टी करण्यात आली नाही. (हेही वाचा, Ajit Pawar on Raj Thackeray: राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राला अजित पवार यांचे उत्तर, 'हे तर जगातल्या प्रत्येकालाच माहिती आहे')

राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीले आहे. या पत्रात वापरलेली भाषा काहीशी टोकदार होती. या पार्श्वभूमीवर ही भेट झाली. राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करत राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. सत्तेचा ताम्रपट कोणीही घेऊन येत नाही. उद्धव ठाकरे तुम्ही सुद्धा. राज्य सरकार मनसे कार्यकर्त्यांवर सूडबुद्धीने कारवाई करत आहे, असा उल्लेख या पत्रात होता. दरम्यान, मनसे कार्यकर्त्यांवर महाराष्ट्र पोलिसांनी केलेली कारवाई, याबद्दलही या भेटीत चर्चा झाल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहीलेल्या पत्राबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांना प्रत्युत्तर देताना अजित पवार यांनी सांगली येथे म्हटले की, सत्तेचा ताम्रपट कोणी घेऊन येत नाही. हे जसे खरे तसे लोकशाहीमध्ये महाराष्ट्रात 145 आमदार जी व्यक्ती स्वत:च्या पाठीशी उभी करु शकते ती मुख्यमंत्री होते. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने इतके संख्याबळ निर्माण केले तर तर तोच मुख्यमंत्री होणार हेच त्रिवार सत्य आहे. त्यामुळे कोणीजरी सांगितले की, मुख्यमंत्री आमक्यातमक्याने व्हावे तरी त्यात बदल होत नाही. आता मत व्यक्त करण्याचा लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे. त्यामुळे त्याला नाकारण्याचे कोणीच कारण नाही. परंतू, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणेला सतर्क केले जाते. तसेच, ते काम करत असताना अल्टीमेटम देतात. हे बरोबर नाही अशी नाराजीही अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्याबद्दल बोलून दाखवली.