मराठी राजभाषा दिनी राज ठाकरे यांनी शेअर केला काश्मिरी तरूणीने गायलेल्या 'रुणुझुणु रे भ्रमरा' गाण्याचा व्हिडिओ (Watch Video)
Raj Thackeray And Kashmiri Girl (Photo Credits: Facebook)

मराठी राजभाषा दिनानिमित्त मेसेजेस, सोशल मिडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येकासाठी ही अभिमानाची गोष्ट असून या मराठी भाषा दिनानिमित्त राजकीय नेत्यांसोबत सिनेसृष्टीतील अनेक दिग्गजांनी मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शुभेच्छांसह एका काश्मिरी मुलीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओतील ही काश्मिरी मुलगी लोकप्रिय गाणे 'रुणुझुणू रे भ्रमरा' गात आहे. हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. शमीम अख्तर असे या तरुणीचे नाव आहे.

मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका काश्मिरी तरुणीचा व्हिडिओ शेअर केला आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे गाजलेले 'रुणुझुणू रुणुझुणू रे भ्रमरा' हे गाणे ही काश्मिरी तरुणी गाताना दिसत आहे. या तरुणीचे कौतुक करत संत ज्ञानेश्वरांच्या अनेक रचना पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि लतादीदींनी त्या कळसास नेल्या. यातलीच एक रचना शमीम अख्तर या काश्मिरी तरुणीला काश्मिरी वाद्यसाजात गावीशी वाटणं, हा कश्मिरीयतने मराठीप्रति दाखवलेला आदर आहे. तो वृद्धिंगत होवो आणि आपल्या राज्याला आपल्या वैभवाची जाणीव करून देवो, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

पाहा व्हिडिओ:

हेदेखील वाचा- Marathi Bhasha Din 2020: राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिग्गजांकडून मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा!

त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या तरुणीप्रमाणे आपल्या राज्यालाही आपल्या वैभवाची जाणीव होवो या हेतूने राज ठाकरे यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

आज सकाळी देवेंद्र फडणवीस, आदित्य ठाकरे , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राजकारणातील अनेक दिग्गज नेत्यांनी मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर प्रसाद ओक, सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी, स्पृहा जोशी या मराठी कलाकारांनीही सोशल मिडियाच्या माध्यमातून मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.