मराठा आरक्षण: मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार; विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा इशारा
राधाकृष्ण विखे पाटील, विरोधीपक्ष नेते विधानसभा आणि देवेंद्र फडणवी, मुख्यमंत्री (Archived images)

Maratha Reservation: 'आता आंदोलन करुन नका, १ डिसेंबरला जल्लोषच करा' असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासंदर्भात केले. मराठा समाज आंदोलकांना दिलासा देण्यासाठी केलेले हे विधान मुख्यमंत्र्यांसाठी अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे. या विधानावर आक्षेप घेत मख्यमंत्र्यांवर हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्याबाबत विरोधक विचारकरत आहेत. विधानसेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी तशी भूमिकाही जाहीर केली आहे.

'मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सभागृहात सादर होण्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, 'आता आंदोलन करू नका, १ डिसेंबरला जल्लोष करा'; असे वक्तव्य करून सभागृहाचा निश्चितच हक्कभंग केलेला आहे. या कारणामुळे येत्या अधिवेशनात आम्ही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आणत आहोत', असे विखे पाटील यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना विखे पाटील म्हणाले की, मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सभागृहाला सादर करण्यापूर्वीच मागासवर्गीय आयोगाचे सदस्य डॉ. राजेश करपे यांनी अहवालाबाबत प्रसारमाध्यमांना मुलाखती दिल्या. या मलाखतीसुद्धा सभागृहाचा हक्कभंगच आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधातही हक्कभंगाचा प्रस्ताव आणला जाणार असल्याचे विखे पाटील यांनी या वेळी सांगितले. सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आझाद मैदानावर उपोषण सुरु आहे. या उपोषणाचा आजचा १६वा दिवस आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मैदानवर जाऊन उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी ते बोलत होते. या वेळी सरकार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बेजबाबदारपणे वागत असल्याचेही त्यांनी सांगितले. (हेही वाचा, मराठा आरक्षण : आंदोलन नको, 1 डिसेंबरला जल्लोष करा - मुख्यमंत्री )

दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना मख्यमंत्री फडणवीस यांनी आता आंदोलन करु नका, १ डिसेंबरला जल्लोषच करा, असे विधान केले होते. मुख्यमंत्र्यांनी हे विधान शनिशिंगणापूर दौऱ्यावेळी केलं होतं. या विधाननंर मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यास आनंदच असल्याची भावना सर्वपक्षीय नेते आणि संघटनांनी व्यक्त केली होती. मात्र, त्यानंतर आता विरोधक मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरुन आक्रमक झाले आहेत.