Maratha Kranti Morcha: तब्बल 16 दिवसांनंतर मराठा आंदोलनाचे उपोषण मागे

आंदोलन मागे घेण्यापूर्वी आगामी अधिवेशनात मराठा समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचा इशारा सरकारला देण्यात आला आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

मुंबईच्या आझाद मैदानावर गेल्या 16 दिवसांपासून सुरु असलेले मराठा क्रांती मोर्चाचं उपोषण आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. मात्र आंदोलन मागे घेण्यापूर्वी आगामी अधिवेशनात मराठा समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचा इशारा सरकारला देण्यात आला आहे. तसंच मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही आंदोलकांचे नेते संभाजी पाटील यांनी दिला आहे.

मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या-

-मराठा समाजाच्यास आरक्षण मिळावे.

-कोपर्डी गुन्हेगारांच्या शिक्षेची तात्काळ अंमलबजावणी करावी.

-मराठा आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावे.

-आंदोलनादरम्यान आत्महत्या केलेल्या कुटुंबियांना शासकीय मदत, सरकारी नोकरी देण्यात यावी.

-अॅट्रसिटी कायद्यात दुरुस्ती करावी.

या मागण्यांसाठी 2 नोव्हेंबरपासून संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरु करण्यात आले होते. उपोषणादरम्यान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री सुभाष देशमुख, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलकांची भेट घेतली.

त्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी या आंदोलकांशी चर्चा केली. बहुतांश मागण्या पूर्ण झाल्या असून लवकरात लवकर मराठा आरक्षण प्रक्रीया पूर्ण होईल असं आश्वासन त्यांनी आंदोलनकांना दिलं. त्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं.