Mahim Mazar | (Photo Credits: Twitter/ANI)

Raj Thackeray on Mahim Mazar Encroachment: मुंबई शहरातील माहिम मजार (Mumbai Mahim Mazar) परिसरात झालेल्या कधीत अनधिकृत बांधकामावर (Unauthorized Construction At Mahim Mazar) मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केली आहे. महाराष्ट्र नव निर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवाजी पार्क येथील गुढी पाडवा मेळाव्यात केलेल्या जाहीर भाषणात माहिम मजार येथे अनधिकृत बांधकाम केल्याचा दावा केला होता. त्यानंतर अवघ्या काहीच तासातच मुंबई महापालिकेने कारवाई करत हे बांधकाम हटवल्याचे सांगितले जात आहे. पाठिमागील दोन वर्षांच्या कालावधीत या ठिकाणी अशा प्रकारचे बांधकाम केल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला होता. दरम्यान, अनधिकृत बांधकाम हटविण्यात आले आहे. मात्र, तेथील मजारीला कोणत्याही प्रकारे हात लावण्यात आला नसल्याचे प्रशासनाने सांगितल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

राज ठाकरे यांच्याकडून पाडवा मेळाव्यात मुद्दा उपस्थित

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा गुढी पाडवा मेळावा मुंबई येथील शिवाजी पार्क मैदानावर पार पडला. या वेळी झालेल्या जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माहिम मजारीचा मुद्दा उपस्थित केला. हा मुद्दा स्पष्ट करताना त्यांनी एलईडी सादरीकरणही केले. आपल्याकडे उपग्रहाद्वारे उपलब्ध झालेली काही छायाचित्रे आहेत. ही छायाचित्रे जुणी आणि नवी अशा दोन्ही वेळची आहेत. सुरुवातीला माहिम मजार येथे समुद्रात काहीच नव्हते. पण आता तिथे दर्गा उभारण्याचे काम सुरु आहे. म्हणजे आता या ठिकाणी दुसरा हाजी मलंग करण्याचा विचार आहे काय? असा सवालही उपस्थित केला होता.

ट्विट

काय म्हणाले राज ठाकरे?

राज ठाकरे यांनी याच सभेतून बोलताना पुढे म्हटले की, राज्यात हिंदुत्त्ववादी सरकार सत्तेत असल्याचे सांगितले जाते. आमचे या सरकारला सांगणे आहे. आम्ही या सरकारला एक महिन्यांची मुदत देतो. सरकारने एक महिन्याच्या आत हे अनधिकृत बांधकाम (माहिम मजार येथील) हटवावे. नाहीतर आम्ही ते हटवू. या वेळी ठाकरे यांनी राज्य सरकारला दोन पर्याय दिले. राज्य सरकारने हे अनधिकृत बांधकाम स्वत:हटवावे किंवा आमच्याकडे (मनसे) दुर्लक्ष करावे.

व्हिडिओ

दरम्यान, माहीम दर्गा ट्रस्टनं मोठा दावा करत म्हटले आहे की, ही जागा 600 वर्षे जुनी असून ऐतिहासीक आहे. राज ठाकरे यांनी केलेल्या दाव्यानुसार या जागेवरचे बांधकाम आताच केले नाही. या जागेला इतिहास आहे. हजरत मकदूम अली शाह याच जागी बसून हजरत ख्वाजा खिजर अली शाह यांच्याकडून शिक्षण घेत असत, असाही दावा माहीम दर्गा ट्रस्टनने केला आहे. ही जागा ऐतिहासीक असली तरी त्या ठिकाणी दर्गा उभारण्याबाबत आम्ही कोणताही विचार करत नसल्याची माहितीही दर्गा विश्वस्त सुहेल खंडवाणी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.