पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचणारे गजाआड जातील; मुख्यमंत्र्यांकडून न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Photo Credits: PTI)

भीमा-कोरेगाव प्रकरणातील अटकेत असणाऱ्या 5 सामाजिक कार्यकर्त्यांची तात्काळ सुटका करण्यात यावी अशी मागणी एसआयटीने केली होती. मात्र ही मागणी फेटाळत, या पाचही जणांची नजरकैद कायम ठेवण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला आहे. पुढचे 4 आठवडे त्यांना नजरकैद राहणार असल्याचेही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले. याबाबत सर्वोच्च न्यायालाच्या निर्णयाचे स्वागत करीत, कोर्टाने अतिशय योग्य निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. तसेच हा निर्णय म्हणजे देशाचा आणि पुणे पोलिसांचा एक मोठा विजय आहे असेही ते म्हणाले. पुढे पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचणारे गजाआड जातील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्यावरून कवी वरवरा राव, अ‍ॅड. सुधा भारद्वाज, अ‍ॅड. अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस आणि गौतम नवलखा यांच्यावर कारवाई केली गेली आहे. याबबत पुणे पोलिसांनी न्यायालयात सर्व पुरावे सादर केले होते. हे सादर केले गेलेले पुरावे नक्षलवाद्यांशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे.

अनेक वर्षांपासून या सामाजिक कार्यकर्त्यांची ही कृत्ये चालू आहेत, मात्र त्याबद्दल आजपर्यंत कोणता पुरावा नव्हता. आता ज्या लोकांचे पुरावे पुणे पोलिसांनी सादर केले आहेत. अशा लोकांना राजकीयदृष्या समर्थन दिलं जात असेल तर आपण कोणाला समर्थन देत आहोत याचा विचार केला गेला पाहिजे असंही मुख्यमंत्री म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणामुळे देशाला अस्थिर करण्याऱ्या गोष्टी, देशाच्या विरोधातील कट तसेच समाजातील लोकांमध्ये द्वेष निर्माण करून विविध वाद आणि कलह निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याचे कट उघड होत आहेत. यामुळे मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले. देशाच्या पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचणारे, समाजात द्वेष निर्माण करणारे गजाआड जातील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.