Maharashtra Weather Forecast: राज्यातील 'या' जिल्ह्यांमध्ये पुढील 5 दिवस पावसाची शक्यता
Rain Update | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

मागील आठवड्यात अंदमान-निकोबारमध्ये (Andaman and Nicobar) मान्सूनचं (Monsoon) आगमन झाल्यानंतर आता पश्चिम किनारपट्टीवरील केरळ, महाराष्ट्र ही राज्य मान्सूनच्या प्रतिक्षेत आहे. त्यापूर्वी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागकडून वर्तवण्यात आला आहे. विदर्भातील (Vidarbha) बुलडाणा (Buldhana), वाशीम (Washim), अकोला (Akola), नागपूर (Nagpur), अमरावती (Amravati), भंडारा (Bhandara), गडचिरोली (Gadchiroli), वर्धा (Wardha), चंद्रपूर (Chandrapur), यवतमाळ (Yavatmal) या जिल्ह्यांसाठी हा इशारा देण्यात आलेला आहे. (Maharashtra Weather Forecast: मध्य महाराष्ट्रात आज गडगडाटासह पावसाची शक्यता)

यास चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विदर्भात पुढील पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. तसंच यावेळी वादळी वारे देखील वाहणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. या पाच दिवसांमध्ये विदर्भात 30 ते 40 किमी प्रतितास इतक्या वेगाने वारे वाहणार आहेत. त्यामुळे लांबचा प्रवास टाळावा आणि घराबाहेर पडण्यापूर्वी हवामानाचा अंदाज घ्यावा, असा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

पहा ट्विट:

त्याचबरोबर दक्षिणेकडून येणाऱ्या तीव्र वाऱ्यामुळे  पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार, झारखंड, कर्नाटक, गोवा, तामिळनाडू, केरळ या राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. तसंच उत्तरेकडील राज्यांतही जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, 1 जून रोजी केरळ तर 10 जून रोजी महाराष्ट्रातील तळकोकणात दाखल होईल. त्यानंतर 10-20 जून दरम्यान मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.