Rain | Representational image (Photo Credits: pxhere)

गुरुवारी मुंबई, पुणे, ठाणे, कल्याणसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या  अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. काही ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना देखील घडल्या.  अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात अवकाळी पाऊस कोसळत आहे, असं हवामान खात्याचं म्हणणं आहे. तसेच पुढील चार दिवस या ्अवकाळी पावसाचे संकट असल्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे.  (हेही वाचा - Maharashtra Weather Update: ऐन दिवाळीत राज्यात हवामान विभागाकडून यलो अलर्ट, या भागात पावसाची शक्यता)

पुढील 4 दिवसांत मुंबई, ठाणे आणि पालघरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी खरीप पिकांची काळजी घ्यावी, अशाही सूचनाही हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत. मुंबईत गुरुवारी रात्रीच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे शहरातील प्रदूषण पातळीत काही प्रमाणात घटली आहे. मुंबईसह कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूरमध्येही मुसळधार पाऊस झाला.

कल्याणमध्ये झाडं कोसळण्याच्या घटना देखील घडल्या. यामुळे काही ठिकाणी वीजपुरवठा देखील खंडित झाला होता. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. परिणामी पुढील 4 ते 5 दिवस कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये तुरळक पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्याच्या अनेक भागात आज म्हणजेच शुक्रवारी ढगाळ वातावरण राहणार काही ठिकाणी अवकाळीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.