Maharashtra Unlock: राज्यातील उपाहारगृहे, दुकाने यांची वेळ वाढवण्याचा टाक्सफोर्सच्या बैठकीत निर्णय

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोविड-19 टास्क फोर्स सोबत पार पडलेल्या बैठकीत निर्बंधात अधिक शिथिलता देण्यासंबंधित निर्णय घेण्यात आला आहे.

CM Uddhav Thackeray (Photo Credits: Twitter)

राज्यातील कोरोना रुग्ण संख्येत घट होत असल्याने अनेक निर्बंध शिथील करण्यात येत आहेत. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या कोविड-19 टास्क फोर्स (COVID19 Task Force) सोबत पार पडलेल्या बैठकीत निर्बंधात अधिक शिथिलता देण्यासंबंधित निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील उपाहारगृहे, दुकाने सुरु ठेवण्याच्या वेळा वाढवण्यास मुभा देण्यात आली आहे. त्याचबरोबर अम्युझमेंट पार्क 22 ऑक्टोबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अम्युझमेंट पार्कमधील मोकळ्या जागेत कोरड्या राईड्ससाठी परवानगी देण्यात येणार आहे. मात्र अद्याप पाण्यातील राईड्सबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.

यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने आपण हळूहळू निर्बंध शिथिल करत आहोत. 22 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरु करत आहोत. त्याचबरोबर उपाहारगृहे व दुकाने यांच्या वेळा वाढवून देण्याची मागणी सात्तयाने होत आहे. त्यामुळे त्यांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

या बैठकीत लहान मुलांच्या टास्क फोर्सचे सदस्य देखील उपस्थित होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांनाही काही सूचना केल्या आहेत. केंद्राच्या संपर्कात राहून लहान मुलांसाठी लस उपलब्ध करून घेणे आणि याबाबतीत निर्णय झाल्यावर लसीकरणाचे नियोजन करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या आहेत. तसंच कोरोनावरील उपचारांसाठी जगात नवनवीन प्रयोग होत असून येणाऱ्या नवीन औषधांच्या बाबतीतही त्यांची परिणामकारकता, किंमत, उपलब्धता याबाबत आत्तापासूनच माहिती घेत राहावी व संबंधितांच्या संपर्कात राहावे, अशा सूचनाही त्यांनी आरोग्य विभागास केल्या आहेत. याशिवाय डेंग्यू, चिकनगुनिया यांच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून त्यांच्या उपचारांकडे देखील पुरेसे लक्ष द्यावे, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. (Maharashtra Colleges Reopen: 20 ऑक्टोबर पासून महाविद्यालयं होणार सुरु; मुंबई विद्यापीठाने जारी केल्या SOP's)

दरम्यान, दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे नियमित मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे, हात धूत राहणे या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे  मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसंच नागरिकांनी बेसावध न राहण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.