Two Drown In Vasai: वसईच्या सुरुची बाग समुद्र किनाऱ्यावर फिरायला आलेल्या दोघांचा बुडून मृत्यू
Drown | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

वसईच्या (Vasai) सुरुची बाग समुद्र (Suruchi Bagh Coast) किनाऱ्यावर फिरायला गेलेल्या 2 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. सुट्टीचा दिवस असल्यामुळे नालासोपारा येथील 7-8 मित्र फिरायला गेले होते. त्यावेळी मौजमस्ती करण्यासाठी दोन जण पाण्यात उतरले. परंतु, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर दोन्ही मुलांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दोन्ही मुलांच्या जाण्याने नालासोपारा परिसरात शोककळा पसरली आहे.

अजित मयपाल विश्वकर्मा (वय, 13) आणि रणजित शिवकुमार (वय, 20) विश्वकर्मा असे पाण्यात बडून मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. अजित आणि रणजित हे दोघेही नालासोपारा पूर्व परीसरातील संतोषभूवन येथील रहिवासी आहेत. अजित आणि रणजित यांच्यासह 8 जण वसईच्या सुरुची बाग समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेले होते. यावेळी अजित आणि रणजित हे दोघेही पोहण्यासाठी खोल समुद्रात गेले. परंतु, पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने हे दोघेही समुद्राच्या पाण्यात बुडाले. हे देखील वाचा- Nagpur: पोलीस कर्मचाऱ्याची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या; Black Fungus मुळे दोन्ही डोळे गमावल्याने आले होते नैराश्य

ही घटना समजताच वसई विरार महापालिकेचे अग्निशमन दलाचे जवान आणि वसई पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बुडालेल्या दोन्ही तरुणांना बाहेर काढले. रणजित विश्वकर्मा हा एका महिन्यापूर्वीच उत्तर प्रदेशवरून घरी आला होता. सोमवारी तो परत उत्तर प्रदेशला जाणार होता. मात्र त्याआधीच ही दुर्दैवी घटना घडल्याचे टीव्ही9 मराठीने वृत्त दिले आहे.

यापूर्वी गुरुवारी भिंवडीमधील पोगाव येथील मस्करवाड्यातील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. अशा घटनांमध्ये वाढ होऊ लागल्याने शहरातील तलाव परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्याची मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे.