Maharashtra Rains: महाराष्ट्रात पावसामुळे 24 ते 27 मे दरम्यान 21 जणांचा मृत्यू; पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, सिंधुदुर्ग, नवी मुंबई जिल्ह्यांना सर्वाधिक फटका

भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या इशाऱ्यानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्यातील अनेक भागांत अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यांमुळे ही आपत्ती घडली. पुणे, सातारा, रायगड, कोल्हापूर, आणि नवी मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये पाणी साचणे, दरड कोसळणे, आणि वीज पडणे यासारख्या घटनांनी जनजीवन विस्कळीत झाले.

Maharashtra Rains: महाराष्ट्रात पावसामुळे 24 ते 27 मे दरम्यान 21 जणांचा मृत्यू; पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, सिंधुदुर्ग, नवी मुंबई जिल्ह्यांना सर्वाधिक फटका
lighting | Twitter

यंदा महाराष्ट्रात मान्सून (Maharashtra Monsoon) वेळेआधीच दाखल झाला. साधारणपणे 11 जूनपासून पाऊस सुरू होतो, मात्र यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात 24 मे रोजी पाऊस सुरू झाला आणि 26 मे पर्यंत मान्सून मुंबईतही पोहोचला. यंदा मे महिन्यात सर्वाधिक पावसाचा 107 वर्षांचा विक्रम मोडला गेला. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, अरबी समुद्रावर निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र चक्रीवादळात रूपांतरित होण्याच्या मार्गावर होते, परंतु ते कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित झाले आणि रत्नागिरीच्या उत्तरेस आणि दापोलीच्या दक्षिणेस सुमारे 40 किमी अंतरावर जमिनीवर आदळले, ज्यामुळे राज्यात 24 मेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली.

अहवालानुसार, महाराष्ट्रात 24 ते 27 मे 2025 या कालावधीत मुसळधार पावसाने हाहाकार माजवला, ज्यामुळे 21 जणांचा मृत्यू झाला आणि 12 जण जखमी झाले. याशिवाय, 22 गायी-म्हशी दगावल्या असून 2 जखमी आहेत. भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या इशाऱ्यानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्यातील अनेक भागांत अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यांमुळे ही आपत्ती घडली. पुणे, सातारा, रायगड, कोल्हापूर, आणि नवी मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये पाणी साचणे, दरड कोसळणे, आणि वीज पडणे यासारख्या घटनांनी जनजीवन विस्कळीत झाले.

या आपत्तीमुळे ग्रामीण तसेच शेतकरी आणि शहरी भागातील रहिवासी अशा सर्वांनाच मोठा फटका बसला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीच्या बचावकार्याचे आदेश दिले असून, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि स्थानिक प्रशासनाने अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. या 21 मृत्यूंपैकी बहुतेक मृत्यू वीज पडणे, पाण्यात बुडणे, आणि झाडे पडणे यामुळे झाले. महाराष्ट्रात 24 मे पासून पावसाने जोर धरला, या कालावधीत, नवी मुंबईतील पनवेल येथे 214 मिमी, फलटण (सातारा) येथे 163.5 मिमी, आणि दौंड (पुणे) येथे 117 मिमी पावसाची नोंद झाली. मुंबईत 24 तासांत 135.4 मिमी पाऊस पडला, ज्यामुळे अनेक भागांत पाणी साचले. (हेही वाचा: Sinhagad Fort: पर्यटकांनो लक्ष द्या! पुण्याजवळील सिंहगड किल्ला 29 मे रोजी बंद; पावसाच्या पार्श्वभूमीवर वनविभाग आणि आपत्ती व्यवस्थापन पथक करणार परिसराची तपासणी)

पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, आणि नवी मुंबई हे जिल्हे या पावसाने सर्वाधिक प्रभावित झाले. दरम्यान, आयएमडीने 29 मे पर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. कमी दाबाचे क्षेत्र मध्य महाराष्ट्रातून पूर्वेकडे सरकत आहे, पण त्याचा प्रभाव कमी होईल. तरीही, पुणे, रायगड, आणि कोल्हापूरच्या घाट भागात मुसळधार पावसाचा इशारा आहे. राज्य सरकारनुसार, आपत्ती व्यवस्थापन विभाग मान्सूनच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, त्यांनी अशा ठिकाणांची ओळख पटवली आहे जिथे भूस्खलनसारखी परिस्थिती उद्भवू शकते. यासोबतच, मुंबई, पुणे सारख्या इतर शहरांमधील जीर्ण अवस्थेत असलेल्या इमारतींची तपासणी सुरू आहे. अनेक इमारतींमधून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

(The above story first appeared on LatestLY on May 29, 2025 09:19 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).