Maharashtra Political Crisis: 'विश्वासघातकांनी परवानगीशिवाय माझा फोटो वापरू नये', राष्ट्रवादीचे संस्थापक Sharad Pawar यांचा इशारा
शरद पवार यांनी बंडखोरांशी जुळवून घेण्यास नकार दिला असतानाही, अजित पवार यांनी त्यांचे काका शरद पवार यांचा फोटो नवीन कार्यालयात ठेवला आहे.
नुकतेच राष्ट्रवादीने (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी काही आमदारांसह सत्ताधारी भाजप-शिवसेनेशी (एकनाथ शिंदे गट) हातमिळवणी केली. ही घटना महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ घडवणारी आहे. त्यानंतर आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार आणि त्यांच्या नेतृत्वाखालील बंडखोरांना जोरदार झटका देत, आपला फोटो कोणत्याही कारणासाठी वापरू नये, असा इशारा दिला. आज अजित पवार यांनी पक्षाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन केले, ज्या ठिकाणी संस्थापक शरद पवार यांचा फोटो ठेवला होता, त्याच दिवशी शरद पवार यांचे हे वक्तव्य समोर आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात औपचारिक विभाजनाचा अनुभव येत असताना, शरद पवार आणि अजित पवार या दोघांनीही आपापल्या पक्ष संघटना मजबूत आणि एकत्र करण्यासाठी स्वतंत्र प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र काका आणि पुतण्याने अवलंबलेली रणनीती भिन्न आहे. दोघांमधील शत्रुत्व नुकतेच सुरू झाले आहे आणि त्यामुळे प्रत्येक वळणावर तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
अजित पवार यांनी रविवारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, त्यांच्यासोबत इतरही आमदारांनी मंत्रीपदाची शपत घेतली. त्यानंतर आज अजित पवार यांनी त्यांच्या समर्थकांसह पक्षाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन केले. शरद पवार यांनी बंडखोरांशी जुळवून घेण्यास नकार दिला असतानाही, अजित पवार यांनी त्यांचे काका शरद पवार यांचा फोटो नवीन कार्यालयात ठेवला आहे. (हेही वाचा: Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष, NCP, महाविकासआघाडी, अजित पवार गट यांच्यात सकाळपासून घडलेल्या महत्त्वाच्या घटना)
शरद पवार यांनी मंगळवारी अजित पवार आणि इतर बंडखोर नेत्यांना ते जिवंत असेपर्यंत त्यांचा फोटो वापरू नका, असा इशारा दिला आहे. ‘माझा फोटो माझ्या परवानगीने वापरा. ज्यांनी माझ्या विचारांशी गद्दारी केली आहे आणि आता माझ्याशी वैचारिक मतभेद आहेत त्यांनी माझे छायाचित्र वापरू नये,’ असे शरद पवार म्हणाले. ते पुढे म्हणाले, ‘मी जिवंत असताना माझा फोटो कोण वापरू शकतो, हे ठरवण्याचा अधिकार माझा आहे. त्यामुळे पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाच माझा फोटो वापरण्याचा अधिकार दिला आहे. इतर कोणीही माझा फोटो वापरू नये.’
यासह, राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी अजित पवार यांच्या कार्यालयातील शरद पवारांच्या फोटोवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, 'जे शरद पवार यांना नेता मानत नाहीत त्यांनी त्यांचा फोटो वापरू नये.'