Maharashtra Political Crisis: 'शिवसेनेच्या आमदारांमध्ये कोणतीही नाराजी नाही'; अजित पवार यांच्या शपतविधीनंतर Shambhuraj Desai यांचे स्पष्टीकरण
जो कोणी आमच्या सोबत येईल त्याचे या प्रयत्नात स्वागत आहे. आम्ही सर्वजण हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्यासाठी एकत्र आलो आहोत आणि त्यामुळे निराश होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही’, असे देसाई यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर शिंदे गटामधील आमदार खूपच निराश झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. आता या अटकळीचे खंडन करताना उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी शिवसेनेच्या आमदारांमध्ये कोणतीही नाराजी नसल्याचे सोमवारी सांगितले.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आणि राज्यातील महायुती सरकार मजबूत करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. जो कोणी आमच्या सोबत येईल त्याचे या प्रयत्नात स्वागत आहे. आम्ही सर्वजण हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्यासाठी एकत्र आलो आहोत आणि त्यामुळे निराश होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही’, असे देसाई यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.
राज्य मंत्रिमंडळात अजूनही 14 पदे रिक्त आहेत आणि लवकरच त्यांचाही विस्तार होईल, असेही ते म्हणाले. महायुती सरकारच्या वतीने राज्यात राबविण्यात आलेल्या विविध योजनांचा आणि निर्णयांची माहिती देण्यासाठी सोमवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाध साधला.
यावेळी देसाई यांनी शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत यांच्यावर 'रस्त्यावरील भविष्य सांगणाऱ्याचा पोपट' अशी टीका केली. ‘राज्यातील राजकीय घडामोडीबाबत पोपटाचे सर्व अंदाज चुकत आहेत. राऊत यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही,‘ असे देसाई म्हणाले. राऊत यांनी सोमवारी त्यांच्या पक्षाचे मुखपत्र सामनाच्या संपादकीयमध्ये अजित पवार लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जागा घेतील, असे भाकीत केले आहे. (हेही वाचा: Ajit Pawar On Eknath Shinde: राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल; एकनाथ शिंदे यांची माहिती)
राज्य सरकारने लोकांच्या भल्यासाठी अनेक प्रकल्प राबविले आहेत, त्यामुळे सरकार खूप मजबूत आहे आणि सामनामध्ये जे भाकीत केले आहे, तसे घडण्याची शक्यता कमीच आहे, असेही देसाई म्हणाले. दरम्यान, आज प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेमध्ये सुनील तटकरे हे पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष होणार असल्याची घोषणा केली. जयंत पाटील यांच्या जागी तटकरे ही जबाबदारी स्वीकारतील. पाटील यांना पदावरून हटवल्याची माहिती यावेळी देण्यात आली.