Maharashtra Monsoon 2020 Updates: आज मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज
Maharashtra Monsoon 2020 | Image Used For Representative Purpose | Photo Credits: unsplash.com

मुंबई, ठाण्यात काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस काल पासून पुन्हा एकदा सक्रिय झाला. काल मुंबईसह उपगनगरांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. आज देखील मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पाऊस पडण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले असल्याने मुंबईतील बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईसाठी येल्लो अलर्ट जारी केला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यात अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

तसंच 1 ऑगस्ट पाऊस पुन्हा राज्यभर मान्सू सक्रीय होणार आहे. त्यामुळे कोकण, मुंबई, नवी मुंबई परिसरात चांगला पाऊस होण्याचा अंदाज असल्याची माहिती मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक (Dy Director General of Meteorology) के.एस.होसाळीकर (K S Hosalikar) यांनी दिली आहे.

काल सकाळपासूनच मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सखल भागात पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. तर कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. काही वेळाने पावसाचा जोर ओसरला मात्र रिपरिप सुरुच होती. आज पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

1 जूनला केरळमध्ये मान्सून आल्यानंतर 3 जूनला महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीला निसर्ग चक्रीवादळाने झोडपलं. त्यानंतर मान्सून आगमनाबाबत शंका निर्माण झाली होती. मात्र हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार 11 जून रोजी महाराष्ट्रात अपेक्षेप्रमाणे मान्सूनचं आगमन झालं. त्यानंतर जुलै महिन्यात दमदार पाऊस राज्यातील नागरिकांना अनुभवायला मिळाला.