Maharashtra Monsoon 2020| Image Used For Representative Purpose | Photo Credits: unsplash.com

महाराष्ट्रामध्ये तळ कोकणामध्ये धुमशान घालणारा पाऊस आता पुढील काही दिवस देखील कोकणात बरसाणार आहे. हवामान वेधशाळेच्या अंदाजानुसार, आता पुढील 24 ते 48 तास दक्षिण कोकणामध्ये काही भागात जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. तर अंतर्गत भागात पावसाचा जोर हा मध्यम स्वरूपाचा असेल. मुंबईमध्ये मागील 24 तासांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे सध्याचे सॅटेलाईट इमेज पाहता दक्षिण कोकण परिसरामध्ये ढगांचे आच्छादन आहे त्यामुळे तेथे पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनचा प्रवास आता उत्तरकडे अधिक होत असल्याने उत्तर प्रदेश, बिहार प्रांतामध्ये तसेच ईशान्य भारतामध्ये मुसळधार पाऊस असेल. परिणामी मध्य महाराष्ट्रामध्ये पुढील 5-6 दिवस अतिमुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता ओसरली आहे. मध्य महाराष्ट्राच्या प्रांतामध्ये अधून मधून जोरदार सरी बरसू शकतात. अंदाजे 11 जुलै पर्यंत महाराष्ट्राचं प्रमाण हे मध्यम स्वरूपाचे असू शकते.

महाराष्ट्रात काल पर्यंत कोकणाच्या दक्षिणेकडील भागात धुव्वाधार पाऊस झाला आहे. तेथे नद्यांना पूर आल्याचे, बंधारे ओसंडून वाहत असल्याचे चित्र आहे. तर मुंबईत मध्येच जोरदार सरी बरसून जात असल्याने अल्हाददायक चित्र आहे. कोकणात राजापूरला यंदा पहिल्यांदाच पुराचा वेढा पडला आहे.  दरम्यान कोल्हापूर  धरण क्षेत्रामध्येही पावसाचा जोर कायम आहे. पंचगंगा नदी  देखील दुथडी भरून वाहत आहे.