Murder And Suicide: प्रेयसीसह तिच्या आईलाही ठार करून फरार झालेल्या तरूणाची गळफास लावून आत्महत्या
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

नवी मुंबईच्या (Navi Mumbai) पनवेल (Panvel) परिसरात प्रेमप्रकरणातून प्रेयसी आणि तिच्या आईची हत्या (Murder) करून फरार झालेल्या आरोपीने आत्महत्या (Suicide) केल्याचे समोर आले आहे. त्याने हिंगोली (Hingoli) येथील एका झाडाला गळफास लावून स्वत: जीवन संपवले असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. आरोपीचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, त्याचे आधीच एक लग्न झाले असल्याने तरूणीच्या आईवडिलांनी त्याला संबंधित तरूणीसोबत दुसऱ्या लग्नासाठी नकार दिला होता. याच रागातून आरोपीने तरूणीच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला केला. ज्यात तरूणीसह तिच्या आईचाही मृत्यू झाला.

प्रकाश मोरे असे आरोपीचे नाव आहे. प्रकाश हा नवी मुंबईच्या पनवेल तालुक्यातील दापोली परिसरात राहणारा होता. दरम्यान, त्याचे शेजारी राहणाऱ्या एका तरूणीसोबत प्रेमसंबंध होते. आरोपीचे पहिले लग्न झाले होते. तसेच पहिल्या पत्नीच्या मृत्युनंतर त्याला दुसरे लग्न करायचे होते. परंतु, या लग्नाला तरूणीच्या घरच्यांचा विरोध होता. मात्र, तरीही आरोपीने या कुटुंबीयांच्या मागे तकादा लावला होता. आरोपीने पुन्हा शुक्रवारी (19 फेब्रुवारी) जाऊन तरूणीच्या आई-वडिलांकडे लग्नाचा विषय छेडला. त्यावेळी तरूणीच्या आई-वडिलांनी पुन्हा नकार दिला. यावर संतापलेल्या तरूणाने तरूणीसह तिच्या कुटुंबियांवर चाकू हल्ला केला. ज्यात संबंधित तरूणी आणि तिच्या आईचाही मृत्यू झाला आहे. त्यानंतर आरोपी तिथून फरार झाला. पोलीस गेल्या तीन दिवसांपासून त्याच्या शोधात होते. मात्र, आज त्याने हिंगोली येथील एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. मीड डेने यासंदर्भात वृत्त दिले आहे. हे देखील वाचा- मुंबई पोलिसांची मोठी कामगिरी! OTT वर Live Porn दाखवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आपली प्रेयसी आणि तिच्या आईचा खून करून पळून गेल्यानंतर आत्महत्या करण्याआधी त्याने फेसबुकवर आत्महत्या करत असल्याबद्दल एक पोस्टही अपलोड केली होती. तसेच त्याच्या आईलाही फोन केल्याचे नवी मुंबई पोलिसांनी सांगितले आहे.