Lockdown In Maharashtra: वेळीच शाहणे व्हा! गर्दी टाळा, अन्यथा जीवनावश्यक सेवाही होतील बंद
Crowd | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकराने कडक निर्बंध लावत लॉकडाऊन (Lockdown In Maharashtra) जाहीर केला आहे. कडक निर्बंधांमधून केवळ अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. या सेवा सुरु राहणार असल्याने अनावश्यक गर्दी टाळा असे अवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे CM Uddhav Thackeray) यांनी केले आहे. या सेवा सुरु राहणार असल्याची खात्री असूनही बरीच मंडळी अनावश्यक गर्दी करताना आढळत आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक शहरांसह महाराष्ट्रभर हे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे लोकांनी वेळीच स्वत:ला सावरले नाही आणि अनावश्य गर्दी करणे थांबवले नाही तर अत्यावश्यक सेवांवरही गदा येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला तसे आदेश दिले आहेत. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली जर कोणी गर्दी करत असेल तर अशा मंडळींवर कडक कारवाई करा, असे या आदेशात म्हटले आहे.

मनात स्पष्टता ठेऊन कारवाई करा- मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, नियमांची कडक अंमलबजावणी करा. अंमलबजावणीची कारवाई करत असताना कोणत्याही प्रकारचा गोंधळ मानात ठेऊ नका. मनात स्पष्टता ठेऊन कारवाई करा. जीवनावश्यक आणि अत्यावश्यक सेवा सुरु आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी या सेवा सुरु आहेत. याचा अर्थ असा नव्हे की जीवनावश्यक सेवांच्या आडून गर्दी करता येईल. ज्या ज्या ठिकाणी गर्दी होईल त्या त्या ठिकाणी कडक करावाई करा. आवश्यकता भासल्यास स्थानिक प्रशासनाने करावाई करुन जीवनाश्यक सेवाही बंद कराव्यात, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आल्या आहेत. (हेही वाचा, New Restrictions in Maharashtra: राज्यात कोरोना विषाणूबाबत नवीन निर्बंध सुरु; नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश)

मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर येथे गर्दी

मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आदी ठिकाणी नागरिक बाजारपेठा, काही ठिकाणी उद्याने, रस्ते, मंडई आदी ठिकाणी गर्दी करताना दिसत आहेत. लॉकडाऊन अधिक कडक होईल, या भीतीने खरेदीसाठी लोक काही ठिकाणी गर्दी करत आहेत. तर काही ठिकाणी मॉर्निंग वॉकबाबत कोणतेही आदेश स्पष्ट नाहीत त्यामुळे आम्ही फिरत आहोत, असे सांगताना दिसत आहेत. एकूणच काय तर बरेच नागरिक मोठ्या प्रमाणावर अनावश्यक कारण काढून घराबाहेर पडत आहेत. गर्दी करत आहेत.

दरम्यान, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी म्हटले आहे की, नागरिकांना गर्दी टाळण्याचे अवाहन करण्यात येत आहे. परंतू तरीही नागरिक गर्दी करत असतील तर वेळ पडल्यास जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद करणयाचे आदेश काढले जातील. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आदी ठिकाणी नागरिकांनी जर गर्दिवर स्वत:हून नियंत्रण मिळवत ती टाळली नाही, तर जीवनावश्यक सेवांवरही बंदी घालण्याची चिन्हे दिसत आहेत.