महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 51 पोलीस कर्मचाऱ्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आकडा 1113 वर पोहचला
Maharashtra Police (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्रात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतो आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या परिस्थितीत घरीच थांबून स्वत:सह परिवाराची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांकडून उपचार करण्यात येत आहेत. तरीही कोरोनाचा आकडा गुणाकाराने वाढत आहे. याच दरम्यान आता पोलीस दलातील 51 कर्मचाऱ्यांची गेल्या 24 तासात कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे एकूण 1113 पोलीसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 678 जणांची प्रकृती सुधारली असून 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांकडून देण्यात आली आहे.

पोलीस दलातील कर्मचारी सुद्धा अहोरात्र रस्त्यावर गस्त घालून आपले कर्तव्य पार पाडत आहेत. या कोरोनाच्या काळात पोलिसांचे सुद्धा बहुमोलाचे कार्य आहे. परंतु त्यांना सुद्धा कोरोनाची लागण होत असल्याच्या घटना दररोज समोर येत आहेत. कोरोनावर अद्याप कोणतेही ठोस औषध नाही आहे. त्यामुळे जगभरातील सर्व वैज्ञानिक त्याच्या लसी संदर्भात अधिक संशोधन करत आहेत. कोरोनाचे राज्यावर आलेले महासंकट दूर करण्यासाठी राज्य सरकार सुद्धा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे.(Coronavirus: अशोक चव्हाण यांना कोरोना व्हायरस संक्रमित, पुढील उपचारासाठी नांदेडहून मुंबईला रवाना)

दरम्यान, महाराष्ट्रात रविवारी 3041 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून 58 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 50231 वर पोहचला आहे. त्यापैकी 33988 जण अॅक्टिव्ह असून एकूण 1635 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 14600 जणांची प्रकृती सुधारली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.