Coronavirus: नंदुरबार जिल्हा कोरोनामुक्त; सर्व कोरोनाबाधित रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह
प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना विषाणूचे (Coronavirus) जाळे अधिक वेगाने पसरत असताना नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील 21 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यापैकी 2 जणांचा मृत्यू झाला होता. तर, 19 कोरोनाबाधित रुग्णांवर जिल्ह्यातील रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, या सर्व कोरोनाबाधित रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने आज नंदुरबार जिल्हा कोरोना मुक्त झाला आहे. जिल्ह्यातील उपचार घेणाऱ्या सर्वच कोरोना रुग्णांना कोरोनामुक्त करण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. यामुळे समाधान व्यक्त केले आहेत. शेवटच्या दोन अर्थात आष्टे व नटावद येथील रुग्णांना सोमवारी सायंकाळी उशीरा डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक उपाय योजना राबवल्या जात आहेत. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचे सावट गडद होताना दिसत आहेत. यातच नंदुरबार जिल्हा कोरोनामुक्त झाल्याने अनेकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण 17 एप्रिल रोजी आढळून आला होता. नंदुरबार जिल्ह्यात 8 मेपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 21 वर पोहचली होती. त्यापैकी 2 जणांचा मृत्यू उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच 19 रुग्णांवर जिल्हा रुग्णालयाच्या आयशोलेशन कक्षात उपचार करण्यात आले. मात्र, आज त्या सर्व रुग्णांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. हे देखील वाचा- महाराष्ट्रात COVID 19 विरूद्ध लढण्यासाठी 'आयुष' उपचार पद्धतीने रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न; 'टास्क फोर्स' ला राज्य सरकार कडून मंजुरी

भारतात सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. राज्यात आज 2 हजार 33 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर, 51 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 35 हजार 58 वर पोहचली आहे. यापैकी 1 हजार 249 अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 8 हजार 437 जण कोरोनामुक्त झाले आहेत.