ठाणे: 29 किलोमीटरच्या शहरांतर्गत मेट्रो प्रकल्पाला राज्य सरकारची मंजुरी
Representational Image | (Photo Credits: ANI)

ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला मंगळवारी (5 मार्च) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली. ठाणे शहरातील वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी आणि वाहतुकीची गरज भागवण्यासाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन तयार करण्यात आला आहे. त्यात 'ठाणे अंतर्गत मेट्रो' प्रकल्पाची शिफारस करण्यात आली. या प्रस्तावाला ठाणे महानगरपालिकेने मंजुरी दिल्यानंतर राज्य सरकारनेही यास मान्यता दिली आहे.

मेट्रोची खासियत:

या प्रकल्पाअंतर्गत ठाणे शहरात वर्तुळाकार मेट्रो बांधण्यात येणार आहे. तिचा पहिला टप्पा 29 किलोमीटरचा असून त्यासाठी तब्बल 13095 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी तब्बल 4 वर्षांचा कालावधी लागेल. तसंच यातून सुमारे 5.76 लाख प्रवासी प्रवास करु शकतात.

ठाणे अंतर्गत मेट्रोमुळे वाहतुकीची समस्या दूर होण्यास मदत होईल. तसंच या मेट्रोचा मार्ग अंतर्गत जुने ठाणे स्थानक, नवे ठाणे स्थानक, वागळे इस्टेट, घोडबंदर रोड, राबोडी, साकेत आणि चेंदणी असा असेल. त्याचबरोबर ही मेट्रो ठाणे रेल्वे स्टेशन, मुंबई आणि भिवंडी मेट्रोलाही जोडली जाईल.

विशेष म्हणजे ठाणे अंतर्गत मेट्रोचे दर मेट्रो 4 वडाळा- घाटकोपर- मुलुंड- ठाणे- कासारवडवली मेट्रो प्रमाणेच असणार आहेत. 17 ते 104 रुपयांपर्यंत या मेट्रोचे तिकीट दर असतील. ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पात 22 स्थानके असणार आहेत. नवीन ठाणे, रायलादेवी, वागळे चौक, लोकमान्यनगर बस डेपो, शिवाईनगर, नीलकंठ टर्मिनल, गांधीनगर, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, मानपाडा, डोंगरीपाडा, विजयनगरी, वाघबीळ, वॉटर फ्रंट, पाटलीपाडा, आझादनगर बस स्थानक, मनोरमानगर, कोलशेत औद्योगिक क्षेत्र, बाळकुम नाका, बाळकुम पाडा, राबोडी, शिवाजी चौक, ठाणे स्टेशन अशी ही स्थानके असतील.