इयत्ता बारावीची परीक्षा आता केवळ 600 गुणांची; शिक्षणमंत्री आशिष शेलार यांची माहिती
आता परीक्षा ही 650 ऐवजी 600 गुणांची असेल. या नवा नियम शैक्षणिक वर्ष 2019-20 आणि शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून इयत्ता बारावी साठी लागू करण्यात येईल.
इयत्ता अकरावी आणि बारावीच्या अंतिम मूल्यमापनात बदल करण्यात आले आहेत. आता ही परीक्षा 650 ऐवजी 600 गुणांची असेल. हा नवा नियम शैक्षणिक वर्ष 2019-20 आणि शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून इयत्ता बारावी साठी लागू करण्यात येईल. सध्या हे अतिरिक्त 50 गुण पर्यावरण शास्त्र विषयास देण्यात येत आहेत. त्याऐवजी नव्या शैक्षणिक वर्षापासून याचे श्रेणीत रुपांतर करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. (जिल्हाधिकारी आता पाऊस आणि आपत्कालीन स्थानिक परिस्थिती पाहून शाळेला सुट्टी जाहीर करु शकतात: आशिष शेलार)
तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलसुरक्षा या नव्या विषयाचे महत्त्व स्पष्ट केल्यानंतर आणि देश पातळीवर तो विषय हाती घेतल्याने या नव्या विषयाचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात येईल. सध्या नववी ते बारावीचा अभ्यासक्रम आणि अन्य केंद्रीय मंडळांचा अभ्यासक्रम याचा अभ्यास करुन विद्यार्थ्यांसाठी सर्वसमावेशक विषय योजना व मूल्यमापन पद्धती अस्तित्वात आणण्यासाठी समितीकडून करण्यात आलेल्या शिफारशींचा विचार करुन काही चांगल्या गोष्टींचा समावेश मंडळाच्या अभ्यासक्रमात करण्यात येईल. यामुळे राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांना सक्षमतेने सामोरे जाण्यास मदत होईल. (महाराष्ट्र दुष्काळी भागातील 10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांना संपूर्ण फी माफी; राज्य सरकारचा निर्णय)
MAHARASHTRA DGIPR Tweet:
इयत्ता अकरावी व बारावीसाठी लेखी परीक्षेसोबतच विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या क्षमतांचे मापन करण्यासाठी अंतर्गत गुण देण्यात येणार आहेत. हे गुण शैक्षणिक वर्षाच्या शेवटी न देता पूर्ण वर्षभरात कधीही देण्याची मूभा राहील. यासंदर्भातील नियोजन ज्युनिअर कॉलेज किंवा उच्च माध्यमिक शाळा स्तरावर करण्यात येईल. तसंच अकरावी-बारावीची वार्षिक परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारीत असेल. विशेष म्हणजे परीक्षेत किमान 25% बहुपर्यायी/वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश करण्यात येईल.