पुणे: शिवसेना पक्षाला विधानसभा निवडणूकीपूर्वी मोठा झटका, विशाल धनवाडे यांनी 300 कार्यकर्त्यांसह सोडला पक्ष
Shiv Sena Chief Uddhav Thackeray | (Photo Credit: You Tube)

महाराष्ट्रात येत्या 21 ऑक्टोबरला विधानसभा निवडणूका पार पडणार आहेत. याच पार्श्वभुमीवर शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. खरतर शिवसेनेचे (Shiv Sena) बंडखोर नेते विशाल धनवाडे (Vishal Dhanawade) यांनी 300 कार्यकर्त्यांसह पक्षाचा राजीनामा दिला आहे. पक्षाकडून तिकिट कापल्याने धनवाडे हे पुण्याच्या कसबा पेठ मतदारसंघातून स्वतंत्र उमेदवाराच्या रुपात निवडणूक लढवणार आहेत. धनवाडे हे जागा वाटपाच्या फॉर्म्युलामुळे नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, विशाल धनवाडे यांना कसबा पेठ येथून उमेदवारी मिळावी अशी त्यांची इच्छा होती, मात्र शिवसेनेने त्यांना या मतदारसंघातून तिकिट दिले नाही. यामुळेच बुधवारी पक्षाचा राजीनामा द्यायचे धनवाडे यांनी ठरवले. कसबा पेठ येथील मतदारसंघातून भाजपने मुक्ता टिळक यांना रिंगणात उतरवले आहे. तर काँग्रेसकडून या जागेवर अरविंद शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.तसेच पुण्यात एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना विशाल धनवाडे यांनी भाजपचे कार्यकर्ते शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना धमकावत असल्याचा आरोप लगावला. एवढेच नाही भाजपकडून आम्हाला त्रास ही दिला जात असल्याचे धनवाडे यांनी सांगितले आहे.(उद्धव ठाकरे यांचं राणे पिता-पुत्रांवर टीकास्त्र; 'ही पाठीमागून वार करणारी औलाद आहे म्हणत भाजपला दिला सावध राहण्याचा सल्ला)

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीसाठी भाजप-शिवसेनेने युती केली आहे. मात्र सिंधुदुर्ग येथे नारायण राणे यांच्यामुळे शिवसेना-भाजप आमने-सामने लढताना दिसून येणार आहेत. कारण भाजपने सिंधुदुर्ग येथून नितेश राणे यांना तिकिट दिले असून त्यांच्या विरोधात शिवसेनेने सतीश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्रासह हरियाणा येथे ही 21 ऑक्टोबरला निवडणुका पहिल्याच टप्प्यात पार पडणार आहेत. या निवडणूकीचा निकाल येत्या 24 ऑक्टोबरला जाहीर करण्यात येणार असून कोणाची सत्ता स्थापन होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.