विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर लातूर येथे शिवसैनिकांमध्येच पत्रकार परिषदेत राडा
Shivsena (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूका अवघ्या दोन दिवसांवर येऊन पोहचल्या आहेत. तसेच आज राजकरण्यांच्या प्रचारसभांचा तोफा थंडावल्या आहेत. मात्र लातूर येथे शिवसैनिकांमध्ये वेगळाच प्रकार दिसून आला आहे. शिवसेनेच्या पत्रकार परिषदेत शिवसैनिकांनी राडा घालत त्यांच्यांच उमेदवाराला शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. लातूर विधानसभा मतदारसंघातून सचिन देशमुख यांना तिकिट दिले असून त्यांनी आज पत्रकार परिषद बोलावली होती. त्यावेळी जिल्ह्याचे तालुकाध्यक्ष हरी साबदे आणि कुलदीप सुर्यवंशी यांनी सचिन देशमुख यांना अपशब्द वापरण्यास सुरुवात केली.

सचिन देशमुख यांनी प्रचारकाळात कुठेही दिसून न आल्याने शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. शिवसेनेच्या वाट्याला लातूरचा मतदारसंघाची जागा देण्यात आली. त्यामुळे नव्या चेहऱ्याचे उमेदवार सचिन देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र प्रचारादरम्यान देशमुख यांची कोणतेही प्रचार यंत्रणा नव्हती असा आरोपही शिवसेनाकार्यकर्त्यांनी केला. यामुळे शिवसेनेचा अपमान झाल्याची भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.('निवडणुकीनंतर मातोश्रीसमोर येऊन कायमचे तोंड बंद करेन', नारायण राणे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांना सूचक इशारा)

लातूर शहर हा विधानसभा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे तगडे नेते दिवंगत विलासराव देशमुख, केशवराव सोनावणे आणि शिवराज पाटील चाकूरकर अशा दिग्गजांनी या मतदारसंघातून नतृत्व केले आहे. सध्यास्थितीत काँग्रेसनेते व माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अमित देशमुख या मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत.

 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 येत्या 21 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. तसेच या निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी लागणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवत एक हाती सत्ता मिळवली होती. परंतु, या विधानसभेत कोणता पक्ष बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.