आदित्य ठाकरे यांच्याकडून शरद पवार यांच्या पावसातील सभेचे कौतुक
Aaditya Thackeray (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीसाठी आज (19 ऑक्टोबर) प्रचारतोफा थंडावल्या आहेत. परंतु राष्ट्रवादीचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचे पावसामधील भाषण फारच गाजत असल्याचे सध्या दिसून येत आहे. सातारा येथे शरद पवार यांची भरपावसातील सभा चांगलीच सर्वांच्या लक्षात राहण्यासारखी राहिली आहे. याच पार्श्वभुमीवर शिवसेनेचे युवाप्रमुख आणि वरळी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पवार यांच्या सभेचे कौतुक केले आहे.

आदित्य ठाकरे यांनी शरद पवार यांच्या पावसातील सभेचे कौतुक करत असे म्हटले आहे की, त्यांच्याकडून बरंच काही शिकण्यासारखे आहे. तसेच पवारांवर वैयक्तिक कधीच टीका मी केली नसल्याचे ही आदित्य ठाकरे यांनी म्हटले. एवढेच नाही पवार हे बाळासाहेबांचे सुद्धा मित्र आहेत. पवार यांनी भरपावसात भिजून जे काही भाषण केले त्याबद्दल त्यांच्याबाबत अभिमान व्यक्त केला जात आहे.

मात्र दुसऱ्या बाजूला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पवार यांच्यावर टीका केली आहे. टीका करत उद्धव ठाकरे यांनी असे म्हटले की, त्यावेळी 70 कोटींचा भ्रष्टाचार केला नसता तर तुम्हाला पावसात भिजायची वेळ आली नसती असे म्हटले आहे. त्याचसोबत शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी सुद्धा पवार यांच्या सभेचे कौतुक केले पण याचा पायंडा बाळासाहेबांनी घातला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.(साताऱ्यात वरूणराजासोबत बरसले 'साहेब'; सोशल मिडीयावर शरद पवार यांच्या अचाट जिद्दीचे कौतुक, पहा Twitter Reactions)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 येत्या 21 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. तसेच या निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी लागणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवत एक हाती सत्ता मिळवली होती. परंतु, या विधानसभेत कोणता पक्ष बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.