Coronavirus In Pune: पुण्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन? महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली महत्वाची माहिती
Coronavirus Lockdown | File Image | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात (Maharashtra) पुन्हा एकदा कोरोनाने (Coronavirus) डोके वर काढले आहे. राज्यातील विविध प्रमुख शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ चिंताजनक आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या अनेक शहरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, तरीही कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात (Pune) पुन्हा एकदा लॉकडाऊन (Lockdown) लागणार का? अशी चिंता पुणेकरांना सतावत आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळण्यासाठी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी कोरोनाचे निर्बंध अधिक करण्याचे आदेश दिले आहे. तसेच पुण्यात लॉकडाऊन लागणार की नाही? हे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून 3 हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. पुण्यात आजपासून जम्बो रुग्णालय पुन्हा सुरू होत आहे. सोबतच ऑक्सिजन बेडची संख्याही वाढवण्यात येणार आहे. यासोबतच दररोज 15 हजार चाचण्या आणि 20 लसीकरण करून कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. रुग्णांची संख्या वाढत असली तरी उपाययोजना वाढवण्यात येतील. मात्र, लॉकडाऊन करण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, निर्बंध आणखी कडक करण्यासंदर्भात विचार सुरू आहे, अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. हे देखील वाचा- Pune: दुकाने तसेच कार्यालयांसाठी मार्गदर्शक सूचना, अटी व सुधारित आदेश जारी

महाराष्ट्रात काल (21 मार्च) 30 हजार 535 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर, 11 हजार 314 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात एकूण 22 लाख 14 हजार 867 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 2 लाख 10 हजार 120 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 89.32% झाले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.