Lockdown in Maharashtra: 'पुढील 2-3 दिवसांत परिस्थितीचा आढावा घेऊन त्यानंतर लॉकडाऊन बाबत निर्णय घेतला जाईल'- Deputy CM Ajit Pawar
Ajit Pawar | (Photo Credits: Facebook)

सध्या देशातील कोरोना विषाणू (Coronavirus) संक्रमितांची संख्या जरी कमी होताना दिसत असली तरी, अजूनही धोका टळला नाही. अजूनही दिल्ली, महाराष्ट्र (Maharashtra), गुजरात अशा अनेक ठिकाणी संसर्गाचे प्रमाण जैसे थे दिसत आहे. अशात सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणावर लोक घराबाहेर पडल्याने आता तर हे प्रमाण अजूनच वाढले आहे. त्यात सध्या महाराष्ट्रातील लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) संदर्भात चर्चा सुरु आहे. आता या बाबतच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Maharashtra Deputy CM Ajit Pawar) यांनी भाष्य केले आहे. पुढील 2-3 दिवसांत परिस्थितीचा आढावा घेऊन त्यानंतर लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले आहेत.

आज अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोना नियंत्रणासाठी प्रशासनाकडून सुरु असलेल्या प्रयत्नांविषयी माहिती दिली. तसेच लॉक डाऊन लागू होणार का नाही याबाबत ते म्हणाले, ‘दिवाळीच्या काळात बाहेर प्रचंड गर्दी होती. गणेश चतुर्थीच्या वेळीही आम्हाला अशीच गर्दी दिसली होती. आता आम्ही संबंधित विभागांशी बोलत आहोत. पुढील 2-3 दिवस परिस्थितीचा आढावा घेतला जाईल आणि त्यानंतर या लॉकडाऊनबाबत पुढील निर्णय घेतला जाईल.’

ते पुढे म्हणाले, 'दिवाळीच्या वेळी रस्त्यावर प्रचंड गर्दी होती, जणू काही गर्दीमध्ये कोरोना चेंगरून मेला असावा. आता अशी शक्यता वर्तविली जात आहे की कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते. तसेच शाळा सुरू करण्याबाबत शासनाने बरेच नियम बनवले आहेत, स्वच्छता कशी राखावी हे देखील सांगितले आहे.' तर अशा प्रकारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लॉक डाऊन लागू होण्याचे संकेत दिले आहेत.

दरम्यान, कोरोना विषाणूमुळे देशात मार्चच्या शेवटच्या आठवड्यात लॉक डाऊन लागू करण्यात आले होते. त्यांनतर आता त्यामध्ये हळू हळू शिथिलता आणत अनेक गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली आहे. अजूनही या विषाणूचे संकट असल्याने सरकार जनजागृती करत आहे, लोकांना नियम पाळण्याचे आवाहन करत आहे. मात्र सणाच्या काळात बाहेर प्रचंड गर्दी पाहायला मिळाली होती. यामुळे गेल्या काही आठवड्यांमध्ये कमी झालेली कोरोना विषाणू रुग्णांची संख्या आता पुन्हा हळू हळू वाढताना दिसत आहे. (हेही वाचा: नाशिक मध्ये पुन्हा संंचारबंदी? सोशल मीडीया मध्ये जुन्या बातम्यांचे स्क्रीन शॉर्ट शेअर करत अफवांंचे पेव)

अशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8 वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. तसेच अनेक राज्यांत सुरु झालेली संचारबंदी पाहता मुख्यमंत्री महाराष्ट्राबाबत काय निर्णय घेतात याची सर्वांना उत्सुकता आहे.