जाणून घ्या राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी नियुक्ती झालेले महाराष्ट्राचे सुपुत्र दत्ता पडसलगीकर नक्की आहेत कोण?
Datta Padsalgikar. (Photo Credits: PTI)

माजी पोलिस महासंचालक (DGP) दत्ता पडसलगीकर (Datta Padsalgikar) यांची काल राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी-अंतर्गत सुरक्षा (Deputy NSA) नियुक्ती करण्यात आली. दोन राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार निवृत्त होत असल्याने दत्ता पडसलगीकर यांची नियुक्ती करण्यात आली. पडसलगीकर हे 1982 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत व आता ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे सहाय्यक म्हणून काम पाहतील. महाराष्ट्राच्या सुपुत्राची इतक्या मोठ्या पदावर नियुक्ती होणे ही राज्यासाठी खचितच आनंदाची बाब आहे. तर चला पाहूया दत्ता पडसलगीकर नक्की आहेत तरी कोण.

दत्ता पडसलगीकर हे महाराष्ट्र कॅडरचे वरिष्ठ भारतीय आयपीएस अधिकारी आहेत. त्यांचा जन्म 26 ऑगस्ट 1958 साली झाला. त्यांचे मुळ गाव सोलापूर-विजापूर सीमेवर आहे. पडसलगीकर यांनी पुण्यामधून फ्रेंच साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेतले. प्रारंभी नागपूर, कराड आणि नाशिक येथे अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून काम पाहिल्यावर त्यांची पदोन्नती झाली. त्यानंतर त्यांनी उस्मानाबाद आणि सातारा येथे पोलिस अधीक्षक म्हणून काम सुरू केले. त्याचवेळी 90 च्या दशकाच्या सुरुवातीला त्यांनी आयबीमध्ये पहिले पद भूषवले. पुढे जवळजवळ एक दशकानंतर हे मुंबईचे पहिले मराठी पोलिस प्रमुख होण्याचा मान पडसलगीकर यांना मिळाला. 30 जून 2018 रोजी, महाराष्ट्राचे नवीन पोलिस महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. (हेही वाचा: माजी पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांची राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी नियुक्ती)

पडसलगीकर यांनी गुन्हे शाखेत पोलिस उपायुक्त (डीसीपी) म्हणून काम केले आहे. तसेच आर्थिक गुन्हे शाखातील डीसीपी, दक्षिण मुंबई (विभाग 1) मधील डीसीपी, वांद्रे-जोगेश्वरी विभागाचे डीसीपी आणि उस्मानाबाद व सातारा येथील पोलिस अधीक्षक म्हणूनही काम पहिले आहे. आयबीमध्ये त्यांनी नागालँड, नवी दिल्ली आणि वॉशिंग्टन (यूएस) येथे काम केले आहे.

दत्ता पडसलगीकर  यांनी मुंबई पोलिस आयुक्त म्हणूनही काम पहिले आहे. काउंटर टेरर ऑपरेशन्समध्ये दीर्घ अनुभव असलेल्या पडसलगीकर  यांनी, 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याबाबत पाकिस्तानविरूद्ध पुरावे गोळा करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. दत्ता पडसलगीकर हे एकमेव पोलिस अधिकारी होते ज्यांनी सर्वप्रथम 26/11 च्या मुंबई हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग असल्याचे उघड केले होते. जवळजवळ एका दशकापासून ते इंटेलिजेंस ब्युरोमध्ये काम करत आहेत. अमेरिकेसह अनेक दूतावासांमध्येही त्यांनी काम केले आहे. पडसलगीकर यांनी आपल्या मुत्सद्दी भाषणामुळे, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एक चांगले नेटवर्क तयार केले आहे.