Kalbhairav Travels च्या चालकाचा प्रवाशांना जंगलात सोडून पळ
प्रतिकारात्मक फोटो (Photo Credits: Instagram)

काळभैरव ट्रॅव्हल्स (Kalbhairav Travels) या खाजगी बसचा चालक प्रवासी आणि बस जंगलात सोडून पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सिंधुदुर्ग (Sindhudurg) मधील बांद्याहून मुंबईला (Mumbai) येणाऱ्या बसच्या चालकाने (Bus Driver) हे कृत्य केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. यावेळी सर्व प्रवासी गाढ झोपेत होते. मध्यरात्री 3 वाजता एका प्रवाशाला जाग आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. लोकमतने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

एका प्रवाशाला जाग आल्यानंतर गाडी का थांबली आहे, हे पाहण्यासाठी तो पुढे गेला. तेव्हा त्याला ड्रायव्हर दिसला नाही. काही वेळ वाट पाहिल्यानंतर त्याने इतर प्रवाशांना उठविण्यास सुरुवात केली आणि त्यांना चालक नसल्याची माहिती दिली.  त्यानंतर प्रवाशांनी बसचा मालक, बुकिंग एजंट यांना फोन करण्यास सुरुवात केली, परंतु, कोणाचाही फोन लागत नसल्याने प्रवाशांना मदत मिळू शकली नाही. अखेर प्रवाशांनी पोलिसांशी संपर्क साधला असता पहाटे सव्वाचारच्या सुमारास चिपळूण पोलिसांचे एक पथक प्रवाशांच्या सुरक्षेसाठी दाखल झाले.

चिपळूण मधील वालोपे गावाच्या हद्दीत जंगल भागात थांबवून चालकाने पळ काढला होता. चालकाने हे कृत्य का केले, याची अद्याप खुलासा झालेला नाही. पोलिस चालकाचा शोध घेत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे काळभैरव ट्रॅव्हल्सच्या विश्वाससार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

दरम्यान, गणेशोत्सवाकरता मुंबईतील अनेक चाकरमानी कोकणात जातात. त्यासाठी ते ट्रेन, बस, खाजगी वाहनं असा पर्याय स्वीकारतात. मात्र नामांकित ट्रॅव्हल्सच्या चालकाचे हे कृत्य पाहता प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.