Monsoon Updates 2020: मुंबई, रायगड, ठाणे जिल्ह्यात पुढील 3 तासात मुसळधार पाऊसाची शक्यता
Mumbai Rains (Photo Credits: ANI)

Monsoon Updates 2020: भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) मुंबई (Mumbai), रायगड (Raigad), ठाणे (Thane) जिल्ह्यातील विविध भागात पुढील 3 तासात मुसळधार पाऊसाची शक्यता वर्तवली आहे. आयएमडीने या तीन जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे.

पश्चिम बंगालच्या उपसागरात मंगळवारी कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. त्यामुळे संपूर्ण कोकणासह मुंबई आणि लगतच्या घाटात, मध्य महाराष्ट्रात पुढील 4-5 दिवस पावसाचा जोर राहणार आहे. शनिवार पर्यंत सांताक्रुज येथे 1898.2 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती. (हेही वाचा - गृहमंत्र्यांच्या रुपाने महिला पोलिसांना मिळाला हक्काचा भाऊ; अनिल देशमुख यांचे महिला पोलीस भगिनींसोबत रक्षाबंधन; पहा फोटो)

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने मुंबईत ऑरेंज तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्गमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. बंगालच्या उपसागरात पुढच्या दोन दिवसांत कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 4 आणि 5 ऑगस्ट रोजी मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

याशिवाय मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात घाट माथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. 3 ते 5 ऑगस्ट दरम्यान विदर्भासह राज्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. 5 ऑगस्ट रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस ते अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.