Pune Stray Dog Attacks: पुण्यात भटक्या कुत्र्यांची (Stray Dog) संख्या सातत्याने वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक भटके कुत्रे आक्रमक झाले असून ते दिवसाढवळ्या सोसायटी संकुलात खेळणाऱ्या मुलांवर हल्ला करत आहेत. जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत पुण्यातील 23 हजार 374 लोकांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. घटनांची संख्या वाढत असतानाही, स्थानिक प्रशासन प्रभावी कारवाई करण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील चंद्रांगण सोसायटी फेज 07 च्या पार्किंगमध्ये खेळत असताना पाच वर्षीय समर्थ सूर्यवंशी यांच्यावर भटक्या कुत्र्याने हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्यामुळे पुणे शहर आणि उपनगरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
कुत्र्यांचा पादचाऱ्यांवर तसेच लहान मुलांवर हल्ले -
शहरातील अनेक भागात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रात्रीच्या वेळी ही कुत्री अनेकदा टोळक्याने फिरतात आणि वाहनांमागे धावून नागरिकांना त्रास देतात. कुत्र्यांनी पादचाऱ्यांवर तसेच लहान मुलांवर हल्ला केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. नागरिक महापालिकेकडे भटक्या कुत्र्यावर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. (हेही वाचा -Mira Road Stray Dog Attack Case: मीरारोड मध्ये 8 वर्षीय मुलावर कुत्र्याचा भीषण हल्ला; डॉक्टरांनी दिला प्लॅस्टिक सर्जरीचा सल्ला)
2024 मध्ये कुत्रा चावण्याच्या घटना
जानेवारी: 1,973
फेब्रुवारी: 2,093
मार्च: 1,961
एप्रिल: 1,920
मे: 2,839
जून: 2,199
जुलै: 2,012
ऑगस्ट: 1,937
सप्टेंबर: 2,026
ऑक्टोबर: 2,189
नोव्हेंबर: 2,225
कुत्र्यांचे रेबीज लसीकरण -
दरम्यान, एप्रिल ते नोव्हेंबर 2024 पर्यंत पुणे महानगरपालिकेने 37,486 भटक्या कुत्र्यांना सापळा रचून त्यांची नसबंदी केली. तसेच कुत्र्यांना रेबीज लसीकरण करण्यात आले आहे. यासंदर्भात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका फुंडे यांनी माहिती दिली आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असल्याने नागरिकांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये मॉर्निंग वॉक, बाहेर खेळणारी मुले आणि रात्री उशिरा मोटारसायकल चालवणाऱ्या लोकांचा समावेश आहे.