Coronavirus Cases In Maharashtra Police: गेल्या 48 तासात महाराष्ट्र पोलीस दलातील 185 कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण तर 2 जणांचा मृत्यू
Police | Image Used for Representational Purpose Only | (Photo credits: PTI)

Coronavirus Cases In Maharashtra Police: राज्यात कोरोना विषाणूचा (Coronavris) संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत हजारो कोरोना योद्ध्यांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे. गेल्या 48 तासात महाराष्ट्र पोलीस दलातील 185 कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाली असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलिस दलातील (Maharashtra Police) कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्यांची संख्या 4288 इतकी झाली आहे.

सध्या 998 कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3239 पोलिस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे. परंतु, कोरोना विरोधात झुंज देताना आतापर्यंत राज्यातील 51 पोलिस कर्मचाऱ्यांचा बळी गेला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र पोलिस विभागाने माहिती दिली आहे. (हेही वाचा -मुंबईमधील कोरोना व्हायरस Peak कदाचित निघून गेला असेल; पण मान्सून, अनलॉकींग व संसर्गाचे नवे परिसर ही चिंता कायम- State Task Force प्रमुख डॉ. संजय ओक)

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात आतापर्यंत पाच वेळा लॉकडाऊन पाळण्यात आले आहे. पाचव्या लॉकडाऊनमध्ये राज्य सरकारने अनेक अटींमध्ये शिथिलता दिली. मात्र, त्यानंतर राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. कोरोना विरोधातील लढाईत कर्तव्य बजावणाऱ्या हजारो कोरोना योद्ध्यांना या विषाणूची लागण झाली आहे. यात डॉक्टर्स, पोलिस, पत्रकार, वैद्यकिय कर्मचारी, सफाई कर्मचारी आदींचा समावेश आहे.

दरम्यान, मंगळवारी राज्यात 3214 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1,39,010 इतकी झाली आहे. यातील 69,631 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तसेच आतापर्यंत राज्यात 6,531 जणांचा मृत्यू झाला आहे.