Local train service (Photo Credits-ANI)

कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेनंतर सर्वसामान्यांना मुंबई लोकलमधून (Mumbai Local) प्रवास करण्याची बंदी घालण्यात आली होती. मात्र, राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच राज्यातील काही जिल्ह्यात पहिल्या टप्पा म्हणून काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. दरम्यान, सर्वसामान्यांनाही मुंबई लोकल प्रवासाची मुभा देण्याची यावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून होत होती. याचपार्श्वभूमीवर कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना आता लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे, दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनासाठी पास उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सर्वसामन्यांच्या लोकल प्रवासाबाबतही भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, कोरोनाचे संकट अद्यापही टळले नाही. मात्र, तरीदेखील अर्थचक्र सुरु ठेवण्यासाठी काही निकष आणि निर्बंध लावून सर्वसामान्य प्रवाशांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरी लस घेऊन 14 दिवस झाले असतील त्यांना आपण 15 ऑगस्ट पासून लोकलमधून प्रवास करता येईल. हे देखील वाचा- Mumbai Local Update: सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास खुला होणार? उद्या टास्क फोर्सची महत्त्वपूर्ण बैठक

कसा मिळवायचा पास?

प्रवाशी मोबाईल एपच्या माध्यमातून रेल्वेचा पास डाऊनलोड करू शकतात. मात्र, ज्या प्रवशांकडे स्मार्टफोन नाही, अशांना शहरातील पालिकेची प्रभाग कार्यालये तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांवरून फोटो पास घ्यावा लागणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे, सत्यता पडताळण्यासाठी पासवर क्यू आर कोड देण्यात येणार आहे.