सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी संपूर्ण जग सज्ज झाले आहे. ठिकठिकाणी थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांना उधाण आले आहे. त्यात मुंबईमध्ये पार्टी करणाऱ्यांची तर चंगळच असते. अशात आता या सेलिब्रेशनला चार चांद लागणार आहेत. कारण महाराष्ट्र सरकारने 31 डिसेंबरच्या रात्री रात्रभर हॉटेल्स, पब्ज, बार चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी याबाबत माहिती दिली. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नववर्षनिमित्त बाजारपेठा 24 तास सुरू ठेवण्याची मागणी केली होती. या गोष्टीला आला राज्य सरकारने परवानगी दिली आहे.
Maharashtra Governemnt issues orders that bars, hotels & pubs can remain open on the night of 31 December in Mumbai. #NewYearsEve
— ANI (@ANI) December 29, 2018
नव्या वर्षाच्या स्वागतासाठी बिगर रहिवासी भागातील बाजारपेठा 24 तास खुल्या ठेवण्यास परवानगी देण्यात यावी, अशा आशयाचे पत्र आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले होते. पुणे, मुंबई, नवी मुंबई आदी शहरांच्या अनिवासी भागातील, मिलच्या जमिनीवरील दुकाने, मॉल, हॉटेल सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी. यामुळे राज्याच्या महसूलात वाढ होईल, शिवाय रोजगारही उपलब्ध होतील असे त्यांनी म्हटले होते.एक दिवस अशा धकाधकीच्या जीवनातून विश्रांती मिळावी म्हणून या शहरांतील हॉटेल्स रात्रभर सुरु ठेवण्यात यावीत अशी मागणी केली होती. त्यानुसार आता 31 डिसेंबरला रात्रभर हॉटेल्स, बार आणि पब्ज सुरु राहणार आहेत. (हेही वाचा : थर्टी फर्स्टला रात्री घरी कसे जायचे?; 31 डिसेंबरला रेल्वेकडून 12 विशेष लोकलची व्यवस्था)
दरम्यान नववर्षाचे स्वागत होत असताना काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सज्ज असून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मुंबईत विविध ठिकाणी तब्बल 40 हजार पोलिस तैनात करण्यात आले आहे. महिलांची छेड काढणारे, दारू पिऊन गाडी चालवणारे यांच्यावर कडककारवाई होणार आहे.