Kolhapur Horse Carriage Race Accident: टांगा उलटल्याने अपघात; घोडागाडी शर्यत अंगाशी, दुचाकीस्वार जखमी (Watch Video)
त्यामुळे पाठीमागून येणारे काही टांगे (घोडागाडी) देखील त्यावर आदळले आणि मोठा अपघात घडला. यावेळी शर्यतीपुढे धावणाऱ्या दुचाकींवरील काही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले.
Kolhapur Accident News: 'टांगा पलटी घोडा फरार' ही म्हण बोली भाषेत अनेकदा ऐकत असतो. पण, कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात असलेल्या पुलाची शिरोली येथे ही म्हण अक्षरश: खरी ठरली आहे. बिरदेव शिवलिंग यात्रा आणि पीर अहमदसो उरूस निमित्त आयोजित घोडागाडी, बैलगाडी शर्यती (Horse Carriage Race Kolhapur) दरम्यान ही घटना घडली. शर्यतीसाठी डांबरी रस्त्यावरुन धावताना घोड्याचा पाय घसरला आणि टांगा (Horse Carriage Race) उलटला. त्यामुळे पाठीमागून येणारे काही टांगे (घोडागाडी) देखील त्यावर आदळले आणि मोठा अपघात घडला. यावेळी शर्यतीपुढे धावणाऱ्या दुचाकींवरील काही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले.
टांगा उलटल्याने दुचाकीस्वार जखमी
पुलाची शिरोली येथील घोडागाडी शर्यत दरम्यान घडलेल्या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, शर्यतीसाठी काही घोडागाड्या रस्त्यावरुन धावत आहेत. दरम्यान, धावताना एक घोडागाडी घोड्याचा पाय घसरल्याने उलटली. इतक्यात पाठिमागून येणारी घोडागाडीही त्यावर आदळली. त्यामुळे घोडागाडी चालक आणि घोडे दोन्ही जमीनिवर पडले. त्याच वेळी घोडागाडीसमोर धावणाऱ्या दुचाकीस्वारांवरही या गाड्या चढल्या. ज्यामुळे काही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी (13 मे) सकाळी 11 वाजणेच्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार, पुलाची शिरोली परिसरात असलेल्या माळवाडी गावात डबल घोडागाडी शर्यत आयोजित करण्यात आली होती. धक्कादायक म्हणजे घोडागाडी शर्यत डांबरी रस्त्यांवर आयोजित करण्यात आली होती. चुकीच्या ठिकाणी शर्यत आयोजित केल्यानेच अपघात घडला असावा अशी स्थानिकांची भावना आहे. (हेही वाचा, Horse Carriages In Mumbai: घोडागाडी शर्यत प्रकरणी चौघांना अटक, मुंबई पोलिसांची कारवाई)
नियमबाह्य पद्धतीने शर्यतीचे आयोजन
घोडागाडी असो किंवा बैलगाडी असो दोन्हींसाठी शर्यत आयोजित करताना विशेष काळजी घ्यावी लागते. त्यासाठी सपाट भूप्रदेश असलेल्या जमीनींवर मोठे मैदान तयार करावे लागते. घोडा अथवा बैल यांचे खूर डांबरी रस्त्यांवर नव्हे तर जमीनिंवर चालण्यासाठी बनलेले असतात. त्यामुळे माती, खडक अथवा जमीन यांवरुन ते लिलया चालू शकतात. मार्गक्रमण करु शकतात. मात्र, सिमेंट काँक्रीट अथवा डांबरी सडक यांवरुन धावणे नैसर्गिकरित्याही त्यांना अडचणीचे असते. वेगाने धावताना सडकेवरुन पाय घसरुन अपघात होण्याची शक्यता अधिक असते. आयोजकांनी ही शक्यताच लक्षात न घेतल्याने घोडागाडी शर्यतीदरम्यान अपघात घडल्याचे शर्यतप्रेमी सांगतात. (हेही वाचा, Bull Attacks Woman: उधळलेल्या बैलाच्या हल्लात महिला गंभीर जखमी, जुना व्हिडिओ व्हायरल (Watch Video))
व्हिडिओ
घोडागाडी, बैलगाडी शर्यतीसाठी नियम व अटी
दरम्यान, घोडागाडी, बैलगाडी शर्यती आयोजित करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारनेही काही नियम आणि अटी घालून दिल्या आहेत. त्यामुळे शर्यती आयोजित करताना त्याचे पालन होणे आवश्यक असते. पुलाची शिरोली येथे नियम धाब्यावर बसवून आणि नियमबाह्य पद्धतीने आयोजित केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते.