मुंबई मध्ये हायअलर्ट; लोकल ट्रेनच्या सुरक्षेसाठी नवा अॅक्शन प्लॅन तयार
Mumbai Local | Representational Image | (Photo Credits: PTI)

नवी दिल्ली (New Delhi) मध्ये दहशतवाद्यांच्या घातपाताचा कट उधळल्यानंतर सर्व यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. मुंबईमध्ये सण आणि उत्तर प्रदेसातील निवडणुका याच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्याकडून कारवाया सुरु केल्या जात आहेत. मुंबई लोकलच्या सुरक्षेबाबत देखील हाय अलर्ट (High Alert) देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर लोकल ट्रेनच्या सुरक्षेसाठी नवं मॉडल उभारण्यात येणार आहे. आरपीएफचे आयुक्त जितेंदर श्रीवास्तव, रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद आणि मध्य रेल्वेचे विभागीय संचालक शलभ गोयल यांच्यात काल एक महत्त्वाची बैठक पार पडली. यात मुंबई लोकलच्या सुरक्षेबाबत अॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. एबीपी माझा ने या संदर्भातील वृत्त दिलं आहे.

दहशतवाद्यांनी मुंबई लोकलची रेकी केल्याची माहिती समोर येत असल्याने सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय  बैठकीत घेण्य्यात आला आहे. यासाठी एक नवं मॉडल तयार करण्यात आलं आहे. मुंबई लोकल आणि स्थानकांवर बॉम्ब शोधक पथक, सीसीटीव्ही, बॅग स्कॅनर मशीन आणि रँडम चेकिंगद्वारे सुरक्षा देण्यात येत आहे. तसंच सुरक्षेसाठी एक मॉडल तयार करण्यात येणार आहे. (भारतात दहशतवादी हल्ल्यासंदर्भात अलर्ट जाहीर, निशाण्यावर यहुदी नागरिक असल्याने इज्राइल दूतवासाजवळ सुरक्षा वाढवली)

दरम्यान, दहशतवाद्यांनी मुंबई लोकलसह राज्यातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी केली होती. मुंबईसह अनेक शहरांमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा कट होता. मात्र केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी तो उधळून लावत जान मोहम्मद नामक सुत्रधाराला अटक केली आहे. तर दिल्ली पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.