Health Minister Rajesh Tope | (Photo Credits: ANI)

Coronavirus: कोरोना विरोधातील लढाईत राज्यातील डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता आपलं कर्तव्य बजावत आहेत. या सर्वांचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी पत्राद्वारे आभार मानले आहेत. कोरोना विरोधातील लढाईमध्ये डॉक्टर आणि कर्मचारी आघाडीचे सैनिक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तुमचं कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्द अपुरे आहेत. या लढाईमध्ये तुम्ही सुद्धा आपल्या प्रकृतीची काळजी घ्या, असं भावनिक आवाहनही राजेश टोपे यांनी केलं आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांना लिहलेल्या या पत्रात राजेश टोपे यांनी म्हटलं आहे की, 'कोरोनाचे जगभरात थैमान सुरू असताना मार्चच्या पहिल्या आठवड्यात या विषाणूचा आपल्या राज्यात शिरकाव झाला आणि तेव्हापासून आपण मंडळी जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा करत आहात. तुमच्या या कार्याला सलाम. तुमच्या तत्पर सेवेमुळे आणि अविरत मेहनतीमुळे आतापर्यंत राज्यातील 39 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यात तुमचा सिंहाचा वाटा आहे. त्याबद्दल आपणा सर्वांचे अभिनंदन व आभार!' (हेही वाचा - विस्थापित कामगारांच्या व्यवस्थेसाठी प्रत्येक जिल्ह्यात सरकारकडून 'नोडल अधिकाऱ्यां'ची नेमणूक; रोहित पवार यांनी शेअर केली अधिकाऱ्यांची यादी)

कोरोनाचा शिरकाव सुरू झाल्यापासून आपण सर्वप्रथम त्याला सामोरे गेला आहात. सर्वात आधी तुम्ही मंडळींनी या युद्धाला सामोरे जाण्यासाठी नेतृत्व केले. त्याचप्रमाणे एखाद्या लढाईत आघाडीवरचा सैनिक झोकून देऊन नेटाने बाजी लढवत असतो तसे तुम्ही आतापर्यंत धीराने कोरोना विरुद्धलढता आहात. समाजाच्या सेवेसाठी हे अतुलनीय शौर्य तुम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून न थकता दाखवत आहात. हे अभिनंदनीय आहे.

तुम्ही दाखवत असलेल्या धीरामुळे रुग्णांना तर मानसिक बळ मिळतेच. परंतु, आम्हालाही त्यामुळे काम करण्याचे पाठबळ आणि प्रोत्साहन मिळत असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. समस्त देशवासीय आपापल्या घरात कुटुंबियांसमवेत असताना आपण मात्र कर्तव्य भावनेतून कुटुंबापासून, आप्तस्वकीयांपासून दूर जात, सेवाभाव जपत आहात. खरं तर आपलं कौतुक करायला माझ्याकडे शब्द अपुरे पडत आहेत, असे राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

'कोरोनाला हरविण्यासाठी आपली लढाई अशीच सुरू ठेवू या. ‘मीच माझा रक्षक’ हा संदेश आपण सर्वसामान्यांना दिला आहे. आपणही आपल्या प्रकृतीची काळजी घ्या, असा आपुलकीचा सल्ला देतानाच आपल्या काही सूचना असतील तर माझ्यापर्यंत जरूर पोहोचवा, असे आवाहनही राजेश टोपे यांनी केले आहे.