Coronavirus: राज्यपालांनी चक्रम वादळांपासून दूर राहायला हवे- शिवसेना
Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari | (Photo Credit: Facebook)

Saamana Editorial: राज्यपालांच्या सदसद्विवेक बुद्धीवर आमचा विश्वास आहे. पण राजभवनाच्या दारावर काही 'चक्रम' वादळे अधूनमधून आदळत असतात. राज्याचे राज्यपाल हे भले गृहस्थ आहेत. त्यांनी अशा चक्रम वादळांपासून सावध राहायला हवे. अन्यथा लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त होण्याचा धोका आहे, अशा शब्दात शिवसेना (Shiv Sena) मुखपत्र अशी ओळख असलेल्या दै. सामना संपादकीयातून (Saamana Editorial) विरोधकांना टोला लगावण्यात आला आहे. राज्यात कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल व राज्य सरकारमध्ये सध्या पदवीच्या अंतिम परीक्षा घेण्यावरुन वाद उत्पन्न झाला आहे. त्यावरुन शिवसेनेने ही टीका केली आहे.

राज्यपाल विरुद्ध सरकार; चक्रम वादळ! या मथळ्याखाली लिहिलेल्या संपादकीयात म्हटले आहे की, कोरोना संकटामुळे महाराष्ट्रासह देशात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात लाखो विद्यार्थी, संपूर्ण शिक्षण क्षेत्रही भरडले गेले आहे. एका पिढीचेच भवितव्य टांगणीला लागले आहे. या पोरांना कोरोनारुपी मगरीच्या जबड्यात ढकलायचे की सध्या परीक्षांची टांगती तलवार दूर करुन सर्वसमावेशक असा निर्णय घ्यायचा? मुख्यमंत्री ठाकरे यांनी सरकार म्हणून एक निर्णय घेतला. तो म्हणजे पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना मागील सत्रातील गुणांचे मूल्यांकन करुन सरासरी गुण दिले जातील. या निर्णयाचे विद्यार्थी, पालक व शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी स्वागत केले, पण झाले असे की, प्रत्येक बाबतीत विरोधच करायचे असे ठरवून काम करीत असलेल्या विरोधी पक्षाने तत्काळ राजभवन गाठले व परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर आक्षेप घेतला.