Coronavirus: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे राजभवनाला खर्चकपातीचे निर्देश
Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari | (Photo Credits: ANI)

Coronavirus: राज्यात दिवसेंदिवस कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढत आहे. देशातील सर्वच घटकांना कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी राजभवनाच्या चालू आर्थिक वर्षाच्या खर्चात विविध उपाययोजनांद्वारे कपात करण्याचे निर्देश राजभवन प्रशासनाला दिले आहेत.

खर्चकपातीच्या निर्देशांमुळे राजभवनाच्या चालू वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये 10 ते 15 टक्के बचत होईल, असा अंदाज आहे. कोरोना विरोधातील लढाईसाठी राज्यापालांनी एक महिन्याचे वेतन तसेच आगामी एक वर्षभर आपले 30 टक्के वेतन देण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, राज्यपालांनी राजभवनाला खर्चकपातीचे खालील निर्देश दिले आहेत. (हेही वाचा - Lockdown: शरद पवार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र, बांधकाम व्यावसायिकांच्या कर्जाचं पुनर्गठन करण्याची मागणी)

  • पुढील आदेशांपर्यंत राजभवन येथे येणाऱ्या देशविदेशातील पाहुण्यांना स्वागताच्या वेळी भेटवस्तू वा स्मृतीचिन्ह देऊ नये.
  • राजभवनात कोणतेही नवे मोठे बांधकाम सुरु करण्यात येऊ नये. केवळ प्रगतीपथावर असलेली चालू कामेच पूर्ण करावी.
  • पुढील आदेशापर्यंत राजभवन येथे कोणतीही नवी नोकर भरती करु नये.
  • स्वातंत्र्यदिनाच्या संध्येला 15 ऑगस्ट रोजी पुणे येथील राजभवन येथे राज्यपाल आयोजित करीत असलेला स्वागत समारंभ यंदा रद्द करण्यात यावा.
  • अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या स्वागताच्या वेळी पुष्पगुच्छ देण्याची प्रथा बंद करण्यात यावी. राजभवन येथील व्हीआयपी अतिथी कक्षांमध्ये फ्लॉवर पॉट तसेच शोभिवंत फुलदाणी ठेवू नये.
  • राजभवनासाठी नवी कार विकत घेण्याचा प्रस्ताव पुढे ढकलण्यात यावा.
  • कुलगुरु व अधिकाऱ्यांसोबतच्या बैठका व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेऊन प्रवास खर्चात बचत करण्यात यावी.

या सर्व उपाययोजनांमुळे राजभवनाच्या चालू वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये दहा ते पंधरा टक्के बचत होणार आहे. राजभवनासंदर्भातील काटकसरीच्या उपाययोजनांमुळे वाचणारा निधी तुलनेने कमी आहे. परंतु, तरीदेखील कोरोनाचा सामना करण्यासाठी हे निर्देश महत्त्वपूर्ण ठरतील, असं कोश्यारी यांनी म्हटलं आहे.