Goa Municipal Election 2021: पणजी महापालिकेवर फडकणार भाजपचा झेंडा, 30 पैकी 25 जागांवर भाजपची सरशी
BJP | (File Image)

गोव्याची राजधानी पणजी महानगरपालिकेसह (Panaji Municipal Corporation Election 2021) ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यात महानगरपालिकेची मतमोजणी पूर्ण झाली असून यात भाजप पक्षाने जोरदार मुसंडी मारत आघाडी घेतली आहे. ज्यात भाजपला (BJP) 30 जागांपैकी 25 जागांवर विजय मिळवता आला आहे. त्यामुळे पणजी महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार हे निश्चित झाले आहे. बहुमतासाठी लागणारा आकडा भाजपने पार केला आहे. त्यामुळे काँग्रेस पुरस्कृत गटासह अपक्षांचा धुव्वा उडाला आहे.

गोव्यात पणजी महानगरपालिका निवडणुकीसाठी मतमोजणी पार पडली. एकूण 30 जागांसाठी ही मतमोजणी घेण्यात आली होती. जाहीर झालेल्या निकालानुसार, 30 जागांचा निकाल जाहीर झाला आहे. 30 पैकी 25 जागा भाजपने जिंकल्या आहे. 25 जागांवर भाजप पुरस्कृत प्रोग्रेस फॉर टूगेदर या पॅनेलचे उमेदवारांनी विजय मिळवला आहे.हेदेखील वाचा- Jalgaon Municipal Corporation Election 2021 Result: जळगाव महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा, जयश्री महाजन महापौरपदी होणार विराजमान

काही दिवसांपूर्वी झालेल्या जळगाव महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेने भाजपला मागे टाकले होते. या लढतीत शिवसेनेने भाजपला दे धक्का करत विजय मिळवला आहे. शिवसेनेच्या जयश्री महाजन (Jayshree Mahajan) यांची महापौरपदी वर्णी लागली असून त्यांनी भाजपच्या उमेदवार प्रतिभा कापसे (Pratibha Kapse) यांचा 15 मतांनी पराभव केला आहे. शिवसेनेने सांगलीनंतर पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करत भाजपचा दणदणीत पराभव केला आहे.

इतिहासात पहिल्यांदाच जळगाव महानगरपालिकेवर शिवसेनेची एक हाती सत्ता स्थापन झाली आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेने भाजपचे 27 तर एम आय एम पक्षाचे तीन नगरसेवक फोडले होते. त्यामुळे मतदानाच्या वेळी शिवसेनेला 45 तर भाजपला 30 मते मिळाली.