Ganeshotsav 2020: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेपासून जिल्ह्यात कोणालाही प्रवेश नाही
Wadala GSB Ganeshotsav Mandal (Photo Credits: Instagram)

पावसाळा सुरु झाल्याबरोबरच देशात सण-उत्सवांची धूम सुरु होते. श्रावणानंतर महाराष्ट्रामध्ये वेध लागतात ते गणेशोत्सवाचे (Ganeshotsav 2020) कोकणात तर गणपतीचा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा होतो. दरवर्षी हजारोंच्या संख्येने चाकरमानी आपल्या मूळ गावी येतात. मात्र यंदा प्रत्येक सणावर कोरोना विषाणूचे (Coronavirus) सावट आहे. आता तर राज्यातील प्रत्येक जिल्हे आपापल्या जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या नागरिकांबाबत दक्ष झाले आहेत. अशात सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्हाधिकाऱ्यांनी 7 ऑगस्टनंतर जिल्हा बंदीचे आदेश दिले आहेत. म्हणजेच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 7 ऑगस्ट पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.

यंदा 22 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी आहे, म्हणजे 22 ऑगस्ट पासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. मात्र सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना बाधित  रुग्णांची संख्या वाढत आहे, त्या दृष्टीने काही निर्णय घेण्यात आले आहेत. आता कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात, जिल्हाधिकाऱ्यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 7 ऑगस्ट रात्री 12 वाजल्यानंतर पासून बाहेरून लोकांना येण्यास मनाई केली आहे. जिल्ह्यात येण्यासाठी ई-पास आवश्यक असून ई-पास नसल्यास वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. यासोबतच दुसऱ्या जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांनी गाव नियंत्रण समितीच्या सल्ल्याने 14 दिवस क्वारंटाइन राहणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. (हेही वाचा: मुंबईतील सर्वात श्रीमंत अशा GBS मंडळाची गणेशोत्सवासाठी मुर्ती 14 फुट साकारण्यासाठी राज्य सरकारने परवानगी देण्याची मागणी)

यासोबतच नागरिकांनी परजिल्ह्यातून येण्याअगोदर क्वारंटाइन राहण्यासाठी घराची क्षमता, सोयी सुविधा काय आहेत, याची खात्री करूनच जिल्ह्यात यावे.  परजिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना 14 दिवस घराबाहेर पडता येणार नाही, असेही सांगितले आहे. जिल्ह्यातील सार्वजनिक मंडळांनी गणपतीची उंची कमी ठेवावी, प्रत्येकाने घरातच कीर्तन-भजन करावे, मिरवणुका काढू नये, एकमेकांच्या घरी दर्शनासाठी जाऊ नये, अशा सूचनाही दिल्या आहेत.

दरम्यान, आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात 10 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 201 झाली आहे. सध्या जिल्ह्यात 43 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आतापर्यंत कोरोनाबधित रुग्णांची संख्या 250 झाली आहे.