खुशखबर! गडचिरोली मध्ये लॉक डाऊनचे सर्व निर्बंध शिथिल; आजपासून सर्व दुकाने सुरु
Image For Representation (Photo Credits: IANS) Representational Image

कोरोना व्हायरसचा (Coronavirus)  वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात 17  मे पर्यंत लॉक डाऊन (Lockdown)  वाढवण्यात आले आहे, मात्र या लॉक डाऊन च्या तिसऱ्या टप्प्यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या नियमांना शिथिल करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील गडचिरोली (Gadchiroli)  जिल्ह्यामध्ये लॉकडाउन चे सर्व नियम शिथिल करण्यात आले आहेत. यानुसार आज, 9 मे पासुन गडचिरोली मधील अत्यावश्यक सेवांपासुन ते अन्यही सर्व दुकाने ही सकाळी 10 ते संध्याकाळी 7 पर्यंत सुरु ठेवता येणार आहेत.गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी आदेश जारी यासंदर्भात परवानगी दिली आहे. सर्व रुग्णालये, पॅथालॉजी केंद्रे, सोनोग्राफी केंद्रे, औषध विक्रेते यांना वेळेचं बंधन राहणार नाही. महाराष्ट्रातील रेड, ग़्रीन, ऑरेंज झोन मधील जिल्ह्यांंची यादी इथे पाहा.

प्राप्त माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्यातील लॉक डाउन हटवण्यात आले असले तरीही सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळणे अनिवार्य असणार आहे. उदा. सलून पासुन सुरु करायचे असल्यास एका वेळी एकाच ग्राहकास प्रवेश देऊन केस कापावे, यावेळी दुकानदार व कारागिराने स्वत:च्या चेहऱ्यावर मास्क बांधावा, एकच कापड वापरणार नाही याची काळजी घ्यावी असे नियम मात्र कायम आहेत. रिक्शामध्ये एक चालक व दोन प्रवासी घेऊन वाहतूक सेवा सुरु करता येईल असेही सांगण्यात आले आहे. गडचिरोली जिल्हा हा ग्रीन झोन मध्ये असल्याने ही सुट देण्यात आली आहे. मात्र ही सुट केवळ जिल्ह्याअंतर्गत असणार आहे. दुसर्‍या जिल्ह्यातुन प्रवास बंद असणार आहे.

दरम्यान, सध्या महाराष्ट्रात 19063 कोरोना बाधित रुग्ण असून त्यापैकी 3470 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तर 14862 रुग्णांवर अद्याप उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 731 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ग्रीन, ऑरेंज, रेड झोननुसार राज्यात सेवा-सुविधांसाठी सवलत देण्यात आली आहे. मात्र कन्‍टेन्मेंट झोनमधील बंधने कायम आहेत.